Pregnancy Childbirth Icon बाळंतपण गर्भपात
बाळंतिणीची काळजी
बाळंतिणीचा आहार व विश्रांती

काहीजण बाळंतिणीला 3 दिवस उपाशी ठेवतात. ही पध्दत चुकीची आहे. बाळंतपणानंतर शरीराची झीज आणि जखम भरून यायची असते. शिवाय बाळाला दूध पाजायचं असते. म्हणून बाळंतिणीला जेवणखाणं भरपूर पाहिजे. बाळंतिणीनं निदान 3 वेळा जेवले पाहिजे. त्यात पौष्टिक पदार्थही पाहिजेत. बाळंतपणानंतर 6 आठवडे विश्रांती आवश्यक असते. ब-याचजणींना ही विश्रांती मिळत नाही. या विश्रांतीमुळे झीज भरून येते, जखमा भरून येतात.

लोह, कॅल्शियम, पौष्टिक पदार्थ

सोबत लोहाच्या आणि कॅल्शियमच्या (चुना) गोळयापण घ्याव्यात. यासाठी हिरवी पालेभाजी, गूळ, व आळीवाचे लाडू खावेत. चालत असल्यास अंडी, मासे, मटन खावे.

योनिमार्गाच्या जखमांची देखभाल

बादलीभर पाणी गरम करावे. गरम करताना त्यात कडुलिंबाचा पाला टाकावा. हे औषधी पाणी घमेल्यात घालावे. बाईला त्यात बसू द्यावे. अशा प्रकारे 15/20 मिनिटे शेक द्यावा. पाटीभर पाणी जमत नसेल तर थोडया औषधी पाण्यानं जखम धुवावी. त्यानंतर निंबोळी तेल जखमेवर लावावे. हे रोज केल्याने 8/10 दिवसांत जखम भरते.

आईच्या तब्येतीत धोक्याची लक्षणे
  • ताप येणे.
  • अंगावरून जाणा-या पाण्याला घाण वास येणे.
  • अंगावरून जास्त जाणे.
  • पोट जास्त दुखणे.
  • लाल पाणी सुरू राहणे.

असे काही आढळल्यास रुग्णालयात पाठवणी करावी.

स्तनामध्ये गाठ व पू होणे

Breast दुधाचा निचरा झाला नाही तर त्याची गाठ होते. गाठ हाताला लागते, दुखते. स्तन दाबून हे दूध काढून टाकावे. स्तनाचा पंप मिळतो. त्याने हे दूध काढता येते. दिवसातून 3/4 वेळा हे करावे. पु झाला असल्यास गाठीच्या बाजूला बाळाला पाजू नये.

दुधाची गाठ पिकणे

दुधाची गाठ 2/3 दिवसांत मोकळी झाली नाही तर ती पिकते. त्यामुळे छाती खूप दुखते. यानंतर ताप येतो. थंडी वाजते. अशा वेळी गाठ कापून पू काढावा लागतो. यासाठी डॉक्टरकडे वेळीच पाठवणी करावी.

बाळंतपणानंतर लगेच

Pregnancy During Bleeding बाळंतपणानंतर खालील त्रास आढळल्यास ताबडतोब रुग्णालयात पाठवा:

  • अचानक रक्तस्त्राव होणे व तो न थांबणे.
  • वार पडायला अर्ध्या तासापेक्षा जास्त उशीर लागणे.
  • अंग (गर्भाशय) बाहेर पडणे.
  • मोठी किंवा खोल जखम होणे.
  • बाळंतपणानंतर झटके येणे, बेशुध्द पडणे.
  • वेडाचा झटका येणे.
बाळाची काळजी

बाळ पूर्ण बाहेर पडल्यानंतर स्वच्छ मऊ कपडयाच्या तुकडयाने त्याचे तोंड आतून साफ करा. रडत नसेल तर बाळाच्या पाठीवर हलकेच थापटा. परत एकदा तोंड व नाकातील चिकट पदार्थ (शेंबटा) काढा. यासाठी म्यूकस नळी उपयुक्त आहे.

बाळ खाली ठेवून नाळ बांधा. यासाठी खास चिमटे (रोहिणी चिमटे) मिळतात. चिमटे असल्यास नाळेवर लावा. नाळ दोन्हीं चिमट्यांच्या मध्ये कापून घ्या. आता नाळेची बाळाची बाजू निर्जंतूक दोर्‍याने बांधून घ्या. बाळाला पाटीत ठेवून कोणाकडे तरी पुढच्या व्यवस्थेसाठी द्या. ऊबदार स्वच्छ सुती कापडात बाळ गुंडाळा.

वार पडणे

नाळेवर चिमटयाच्या मदतीने ताण देऊन व पोटावर डावा हात ठेवून वार मोकळी झाली आहे का ते पहा. मोकळी असल्यास ती बाहेर पडेल. नसल्यास दर दोन मिनिटांनी तोच प्रयोग करा. वार बाहेर पडल्यावर ती पूर्ण बाहेर पडली आहे की नाही ते तपासून घ्या. वार संपूर्ण नसल्यास पातळ आवरणाचे तुकडे आत असतील. ते बोटाच्या चिमटीत पकडून काढण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत वार पूर्ण पडत नाही, तोपर्यंत रक्तस्त्राव चालूच राहतो.

नाळ व वार पडल्यानंतर असल्यास मेथर्जिन इंजेक्शन (एक मि.लि.) मांडीवर किंवा कमरेवर द्या. त्यामुळे गर्भाशय आकुंचित होऊन जास्त रक्तस्त्राव होण्याचे टळते. मेथर्जिन इंजेक्शनची कुपी थंड ठिकाणी ठेवली तरच त्याची शक्ती टिकते. फ्रीज असल्यास चांगले.

जखमा ?

योनिमार्गाची स्वच्छता करून जखम वगैरे झाली आहे का ते पहा. असल्यास ती स्वच्छ करून तपासा. जखम खोल नसेल तर नुसते मलम लावून आपोआप जखम भरते. मात्र जखम खोल व मोठी असेल तर प्रशिक्षित व्यक्तीने टाके घालावे लागतात. जखम गुदाशयात (मोठे आतडे) उघडत असेल तर (बोट जखमेत घालून ते कोठे जाते हे पहा). अशी जखम फार काळजीपूर्वक शिवावी लागते.

रक्तस्त्राव नाही ना?

बाळंतपणात एकूण सुमारे अर्धा लिटर रक्त जाते. बाळंतपण पूर्ण झाल्यानंतर गर्भाशय साधारणपणे छोटया (सोललेल्या) नारळाइतके लहान व टणक होते. असे झाले म्हणजे सर्व काही व्यवस्थित झाले आहे असे समजा. गर्भाशय मोठे आणि मऊ असेल तर आत रक्तस्त्राव किंवा गाठी असण्याची शक्यता आहे. अशा वेळी रुग्णालयात पाठवणे चांगले. प्रथमोपचार म्हणून गुदद्वारात प्रोस्टाग्लॅडिनची गोळी बसवून द्यावी. यामुळे रक्तस्त्राव कमी होतो.

रक्तस्त्राव

बाळंतपणानंतर लगेच किंवा 24 तासांत केव्हाही रक्तस्त्राव होऊ शकतो. बहुधा याचे कारण म्हणजे गर्भाशयात वारेचा काही भाग, रक्ताची गाठ वगैरे राहून जाणे हे असते. तसेच गर्भाशय नीट आकुंचन न पावल्यामुळे रक्तवाहिन्या मोकळया राहतात व रक्तस्त्राव होतो. जन्ममार्गातील जखमांमुळेही रक्तस्त्राव जास्त होतो. उदा. गर्भाशयाचे तोंड (चुंबळ) फाटणे, योनीमार्गात जखमा होणे. रक्तस्त्राव होत असल्यास प्रोस्टोडिन किंवा मेथर्जिन इंजेक्शन देऊन ताबडतोब रुग्णालयात नेणे आवश्यक आहे.

प्रोस्टोडिन नावाचे औषध इंजेक्शन-स्वरुपात मिळते. ते फ्रीजमध्ये थंड ठेवावे लागते. रक्तस्त्राव थांबत नसल्यास हे इंजेक्शन स्नायूमध्ये टोचून द्यावे. अगदी प्रभावी असलेल्या या इंजेक्शनने गर्भाशय आकुंचन पावते व रक्तस्त्राव 2-5 मिनिटांत थांबतो. न थांबल्यास हॉस्पिटलमध्ये न्यावे.

इंजेक्शन नसल्यास मिझोप्रोस्टोनच्या गोळया (200mg) 2 गोळया जिभेखाली चघळण्यास देण्याने गर्भाशय आकुंचन पावते व रक्तस्त्राव थांबतो.

रक्तस्त्राव हा अत्यंत धोकादायक असतो. अनेक स्त्रिया यामुळे दगावतात.

आयुर्वेद

बाळंतपणाच्या वेळेच्या योनिमार्गाच्या जखमा टाके घालण्यासारख्या असल्यास, टाके घालावेत. नंतर त्रिफळा काढा व कडूलिंबाच्या काढयाने धावन केल्यास जखमा लवकर भरून येतात. यासाठी कडूलिंबाचे पंचांग (पाने,फुले,फळे, साल, काडया) कुटून काढा करावा व दिवसातून दोन वेळा वापरावा (पोटात देऊ नये). असे तीन चार दिवस करावे. धावनानंतर शक्य असल्यास जखमांवर लावण्यासाठी गाईचे जुने तूप (चार-पाच वर्षांपूर्वीचे) वापरावे. यासाठी तूप राखून ठेवता आल्यास चांगले.

बाळंतपणाच्या संभाव्यतारखेच्या महिनाभर आधी तीळतेलाची बस्ती द्यावी. याने बाळंतपण सुखावह आणि सोपे होते असा आयुर्वेदाचा अनुभव आहे.

होमिओपथी निवड (प्रसूतीनंतर रक्तस्त्राव)

आर्निका, आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, फेरम फॉस, लॅकेसिस, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर, हिमॅमेलिस

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.