दुस-या वर्षभरात बाळाचे वजन सुमारे 2.5 किलोने वाढते, उंची 10 ते 12 से.मी. वाढते.
एक वर्षाअखेर मुलाच्या मेंदूची वाढ मोठया माणसाच्या मानाने दोन तृतियांश (म्हणजे 66टक्के) झालेली असते. (डोक्याचा घेर 47से.मी.) बाळाच्या डोक्याची वाढ दोन वर्षे पूर्ण होताच मोठया माणसाच्या चार पंचमांश (म्हणजे 80%) झालेली असते. (डोक्याचा घेर 49 से.मी.) दुस-या वर्षाअखेरपर्यंत एकूण 14 ते 16 दात येतात.
12-13 व्या महिन्यात आधार धरून चालणारे मूल 15व्या महिन्यापर्यंत स्वतंत्रपणे चालते. 18व्या महिन्यापर्यंत मूल (दीड वर्ष) अडखळत पळू शकते.
दीड वर्षाच्या वयात एक हात धरून जिना चढणे बाळाला जमते. पण एक हात धरून उतरता यायला 20-21 महिने (पावणे दोन वर्षे) लागतात.
दुस-या वर्षामध्ये बाळाला आपल्या भोवतीची प्रत्येक गोष्ट कुतूहलाची वाटते व हाताळावीशी वाटते. या वयातील मुलांपासून धार असलेल्या किंवा इजा करू शकतील अशा गोष्टी, तसेच औषधे, खते, विषारी औषधे, इत्यादी दूर ठेवणे महत्त्वाचे असते.
दीड ते दोन वर्षे हळूहळू एकावर एक वस्तू ठेवून छोटा मनोरा करणे बाळाला जमू लागते. बोलण्याची सुरुवात करण्याच्या वयाबाबतीत प्रत्येक मुलात फरक पडतो. काही मुले लवकर शब्द उच्चारू लागतात तर काही उशिरा. पण दोन ते अडीच वर्षापर्यंत बहुतेक सर्व मुले छोटी वाक्ये बोलू शकतात.
दीड ते दोन वर्षानंतर शू (लघवी) किंवा शी लागल्याची सूचना मूल देऊ शकते आणि या वयानंतर संडास किंवा मोरी वापरण्याबद्दल मुलांना शिकवता येते.
वजन व उंची वाढण्याचा वेग तीन ते पाच वर्षे या वयामध्ये कमी असतो. प्रतिवर्षी वजनात सुमारे दोन किलो व उंचीत 2-3 इंच (सहा ते आठ सें.मी.) वाढ होते.
तीन वर्षानंतर मूल एकेका पायरीवर एकेक पाय ठेवून चढू शकते. पण उतरताना प्रत्येक पायरीवर दोन्ही पाय ठेवत उतरते. उतरताना एका पायरीवर एका पायाचा वापर करायला चौथ्या वर्षी जमते. पाचव्या वर्षी लंगडी घालणे जमते.
तिस-या वर्षानंतर आपले वय सांगणे, मुलगा की मुलगी सांगणे त्याला/तिला जमते.
चौथ्या वर्षानंतर फुलीचे चित्र काढता येते, तर पाचव्या वर्षानंतर तिरपी रेष असलेली आकृती (उदा. त्रिकोण) काढता येते.
अडीच ते तीन वर्षांपर्यंत सर्व दुधाचे दात (पहिले दात) आलेले असतात (एकूण 20) हे दात पडून नवे यायची सुरुवात सहाव्या सातव्या वर्षी होते आणि कायमचे दात येऊ लागतात. 12-13 वर्षांपर्यंत सर्व कायमचे दात येतात. फक्त शेवटची दाढ 17 ते 21 या वर्षात येते. (एकूण दात 32).
वाढ व विकासाचे हे सर्व टप्पे थोडेफार पुढेमागे होऊ शकतात. उदा. जे मूल वेळेवर किंवा वेळेआधीच चालू लागते त्याच्याबाबतीत दात उशिरा येऊ शकतात किंवा बोलणे उशिरा येते. पण वाढीचे अनेक टप्पे उशिरा येत असतील, तर मात्र अधिक तपासणीची गरज असते.