Health Friends Icon आरोग्यमित्र आरोग्य सेवा
सतत अभ्यास, निरीक्षण

शोधक वृत्तीने निरीक्षण, अभ्यास करीत राहिले पाहिजे. यामुळेच डॉक्टर-वैद्य कुशल होत जातात. आजाराची लक्षणे, उपचार, कारणमीमांसा याबद्दल सतत अभ्यास असावा. ज्ञानात सतत भर पडत असते. त्यासाठी मन उघडे ठेवले पाहिजे. मला समजते तेवढेच खरे ही भूमिका बरोबर नाही. अनेकवेळा एखादा गुराखी देखील एखाद्या आजारावर चांगला इलाज करू शकतो. याबद्दल अहंकार न ठेवणे हेच चांगले. तुम्ही अशी शोधक वृत्ती दाखवली तर लोक स्वत:हून तुम्हांला माहिती देतील, नाहीतर माहिती देणारच नाहीत. आजूबाजूच्या वनस्पतींचाही अभ्यास चालू ठेवला पाहिजे.

आजारी माणसाशी वागताना

आधुनिक वैद्यकाचा जनक हिप्पोक्रॅटीस याने डॉक्टरांनी पाळायच्या सूचना लिहून ठेवल्या आहेत. डॉक्टरांनी या शपथेचे पालन करायचे असते. आपणही आजाऱ्यांशी वागतांना काही गोष्टी पाळल्या पाहिजेत.

  • सर्व लहानथोर गरीब-श्रीमंत व्यक्ती समान आहेत, त्यात जाती-धर्म यांचा भेदाभेद येता कामा नये. आपले ज्ञान व कौशल्य वापरून येईल त्यांचे हित करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या व्यक्तीचे कोठल्याही प्रकारे अहित होणार नाही याची काळजी घ्या.
  • आपल्याला येत नसेल तर अज्ञानापोटी चुकीचे काही करू नका. योग्य उपचारासाठी प्रमाणित तज्ज्ञाकडे पाठवणे व मार्गदर्शन करणे हे आपले कर्तव्य आहे.
  • वैद्यक हा व्यवसाय आहे, धंदा नाही. योग्य मोबदला घेणे हे न्यायाचे असले तरी कोणालाही केवळ पैशाच्या कारणावरून विन्मुख पाठवणे हे वैद्यकीय नीतिमत्तेत बसत नाही. बरे करणे, ठाऊक आहे ते समजावून देणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे. लोकांना लाचार न करता मदत करणे हीच आपली पध्दत असायला हवी. औषधगोळया देणे शक्य नसले तरी धीर देणे, मार्गदर्शन करणे हे डॉक्टरांचे काम आहे.
  • सहानुभूती, ममत्व ठेवा, पण शास्त्रीय अभ्यासाला थोडी अलिप्तताही लागते. लोकांबद्दल सहानुभूती असावी. पण शरीरदु:खांबद्दल अलिप्त शास्त्रीय दृष्टिकोन ठेवावा.
  • आपल्या आजारांबद्दल काहीजणांना इतरत्र बोललेले आवडत नाही. खरेतर आजारी माणूस सांगतो ते आपण पोटात किंवा जवळच्या नातेवाईकांत ठेवले पाहिजे. विशेष करून लिंगसांसर्गिक आजार आणि कमीपणा वाटतील असे आजार याबद्दल गुप्तता असावी.
  • रागावणे, रागावून बोलणे इ. गोष्टी या कामात शोभत नाहीत. कितीतरी वेळा अज्ञानाने, आळसाने, गैरसमजाने लोक काही चुका करतात किंवा अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत. याबद्दल राग न बाळगता सहनशक्ती दाखवून न दुखवता व्यवहार करणे जमले पाहिजे. रागीटपणा हा अशा कामात कमीपणा आणतो.
  • काटेकोर स्वच्छता पाळा, पण हात न लावता बरे करणे जवळपास अशक्य असते. शब्दांनी जो दिलासा मिळत नाही तो स्पर्शाने मिळतो. पण स्पर्शाचा योग्य तो उपयोग करावा, अतिरेक किंवा गैरवापर टाळावा. एकूणच या कामात संयम कामी येतो.
  • स्त्रियांशी वागतांना पुरुषांनी आदर व पुरेसा विनय ठेवला पाहिजे. समोरची व्यक्ती तुमच्याकडे दु:ख घेऊन आलेली असते. त्या भावनेचे पावित्र्य जपले पाहिजे. कोणालाही तुमच्याकडे असुरक्षित वाटणार नाही याची काळजी घ्या.
  • व्यंगाचा उल्लेख वाईट वाटेल अशा रीतीने करू नका. वरून दाखवले नाही तरी माणसांना आतून त्याबद्दल दु:ख वाटत असते याची सहृदय आठवण ठेवा.
  • आजारी माणूस केवळ एखादे दुखणे घेऊन आला असला तरी केवळ त्याचा आजार/ अवयव एवढेच लक्ष्य ठेवू नका. ब-याच लोकांना आपली सुखदु:खे तुम्हांला सांगावीशी वाटतात. त्यांना मनमोकळे होऊ द्या. शक्य असल्यास त्यात सहभागी व्हा. नुसत्या आजाराचे नाही तर जीवनाचे भान ठेवा.
  • आपल्या कामाची जाहिरात करणे हे वैद्यकीय नीतिमत्तेत बसत नाही. तुमचे ज्ञान आणि हातगुण चांगला असेल तर हळूहळू लोकांना ते कळेल. कोठल्याही प्रकारे जाहिरात करू नका.
  • औषध-गोळया ही बरी करायची साधने आहेत. त्याबद्दल योग्य मोबदला घ्यावा पण त्याचा व्यापार करू नका. मनात एकदा व्यापारवृत्ती शिरली की प्रत्येक रूग्णाकडे बघण्याची नजर दूषित होईल.
  • काही लोक कधी इतरांकडून औषधोपचार करून घेतील, अडचणीच्या वेळीच तुमच्याकडे येतील. असे असले तरी याबद्दल मन स्वच्छ ठेवा. पूर्वग्रह बाळगू नका. इतर डॉक्टर-वैद्य वगैरेंशी स्पर्धा, असूया बाळगू नका. त्यांच्याबद्दल कोणी बरेवाईट सांगू लागले तर दुर्लक्ष करा किंवा विषय बदला. अशा बोलण्यात आपण मनानेही भाग घेऊ नये, शब्दाने तर नाहीच.
अडचणी व समस्यांची लोकांशी खुली चर्चा

लोक अनेक प्रश्न समर्थपणे सोडवू शकतात. ज्ञान हे अनेकांच्या अनुभवातून तयार होते, कोण्या एकाच्या नाही. एखादी समस्या आपल्याकडून सुटत नसली तर योग्य लोकांशी बोलून पहा; कदाचित उत्तर मिळेल. आपण नव्हतो तेव्हाही लोकांना या समस्या होत्या. यावर त्यांच्या परीने त्यांनी काही उत्तर शोधले असण्याची शक्यता असते. आजारांच्या बाबतीत ब-याच वेळा लोक काही ना काही उपाय करून पाहतात. त्याचा उपयोग होऊ शकतो. आपल्यापेक्षा तज्ज्ञ आहेत त्यांना तर विचारलेच पाहिजे.लोक अडाणी आहेत; त्यांना काही कळत नाही असा ग्रह करून घेऊ नका. तुमच्या ज्ञानाशी संबंध आल्यावर त्यांनाही काही नवे उपाय सुचतील. यासाठी संवादाने प्रयत्न करून पहा.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.