Children Health Icon बालकाची वाढ आणि विकास नवजात बालकांची निगा
लसीकरण

लहान मुलांचे कर्दनकाळ असलेले सहा रोग घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ (पक्षाघात) रोगप्रतिबंधक लस दिल्याने टाळता येतात.

आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्यकेंद्रात या लसी मोफत मिळतात. (वेळापत्रक व इतर माहिती आधुनिक औषधशास्त्र या प्रकरणात दिली आहे.)

प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात, किंवा त्या जंतूंचा अंश असतो. ही लस शरीरात गेली तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लसीत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो.

बी.सी.जी.

बाळाचा क्षयरोगापासून (विशेषत: मेंदूचा क्षयरोग) बचाव करण्यासाठी बी.सी.जी. उपयोगी आहे. ही लस डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचतात. ही लस जन्मल्यावर लगेच दुस-या दिवशीही दिलेली चालेल. शक्यतो ही लस तीन-चार महिन्यांपर्यंत टोचली जावी. काही कारणांनी हे राहून गेल्यास एक वर्षापर्यंत तरी टोचून घेणे आवश्यक आहे.

टोचलेल्या जागी 15 दिवसांनी छोटी पुळी तयार होते. चार ते सहा आठवडयांत ही पुळी भरून येऊन बी.सी.जी. ची खू्रण तयार होते.

या जखमेवर कुठलेही औषध लावू नये. बी.सी.जी. टोचल्यावर त्या दिवशी आंघोळ घालू नये. तसेच एक दिवस ती जागा धुवू नये किंवा शेकू नये.

Vaccination काही मुलांना बी.सी.जी. लस टोचल्यावर त्या बाजूच्या काखेत गाठी येतात. या गाठी दुख-या असतील तर त्यासाठी कोझालसारखे जंतुविरोधी औषध वापरावे लागेल. गाठी दुख-या नसतील तर तीन महिन्यांत गाठी आपोआप जिरतात. तीन महिन्यांत गाठी ब-या न झाल्या तर क्षयरोगविरोधी औषधे वापरावी लागतात.

त्रिगुणी लस

या लसीत डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात या तीन लसींचा समावेश आहे. त्रिगुणी लस वयाच्या तिस-या महिन्यानंतर प्रत्येक महिन्यात एकदा याप्रमाणे तीन वेळा (शक्यतो मांडीवर) टोचतात. लस टोचल्यानंतर एक दिवस ताप येतो. त्यासाठी पॅमालची चतकोर गोळी किंवा तापाचे पातळ औषध द्यावे. संपूर्ण प्रतिकारशक्ती येण्यासाठी दरमहा पहिले तीन व नंतरचे बूस्टर डोस जरूरीचे आहे. शक्यतो पहिल्या दोन इंजेक्शनमधील अंतर दोन महिन्यांहून अधिक असू नये.

पोलिओ

Polio Drop हे डोस लाल रंगाचे थेंब असतात. बाळाला पोलिओचा पहिला डोस जन्मल्यानंतर 1/2 दिवसांत द्यावा. नंतरचे डोस त्रिगुणी लसीच्या बरोबरीने मुलांना तोंडाने पाजतात. डोसच्या आधी व नंतर अर्धा तास गरम पाणी, गरम दूध देऊ नये.

त्रिगुणी लस व पोलिओ डोसमधील शक्ती उष्णतेमुळे नाहीशी होते. यासाठी या लसी शीतकपाटात (रेफ्रिजरेटर) ठेवाव्या लागतात. थंडाव्यात न ठेवलेले डोस देऊन न देण्यासारखे आहे. यासाठी डॉक्टरकडे, आरोग्यकेंद्रांमध्ये मुलांना डोस दिले जातात त्या ठिकाणी चालू स्थितीतील शीतकपाट असायला पाहिजे. काही वैद्यकीय व्यावसायिक शीतकपाटाची सोय नसतानाही तसेच हे डोस देतात. त्यामुळे बाळाचा फायदा तर होत नाहीच, पण बाळाला लस देऊन घेतल्याचे खोटे समाधान पालकांना मिळते व पोलिओचा धोकाही संभवतो.

पल्स पोलिओ – गेली अनेक वर्षे ही मोहीम भारतभर राबवली जाते. यात पोलिओ थेंब दिले जातात.

गोवर प्रतिबंधक लस

गोवर हा तसा साधा आजार असला तरी अशक्त किंवा कुपोषित मुलांमध्ये तो जीवघेणा ठरू शकतो. अशा मुलांमध्ये गोवरानंतर न्यूमोनिया, छातीत कफ (श्वासनलिकादाह) किंवा दबलेला क्षयरोगाचा आजार उफाळून येऊ शकतो. कित्येकदा या आजारानंतर हगवण, रक्ती आव लागते. यामुळे मुळात सौम्य कुपोषित असलेली मुले जास्तच कुपोषित होतात. म्हणून गोवर लस महत्त्वाची असते.

बाळाला नवव्या महिन्यात एक गोवर लसीचे इंजेक्शन व 15 व्या महिन्यात किंवा दीड वर्ष पूर्ण झाल्यावर बूस्टर (फेरडोस) इंजेक्शन द्यावे. गोवर लसीनंतर ताप किंवा गाठही येत नाही. हे इंजेक्शन त्वचेखाली देतात. या लसीसाठीही शीतकपाट आवश्यक असते.

द्विगुणी लस

Health Day यामध्ये फक्त घटसर्प व धनुर्वात प्रतिबंधक लस असते. यात डांग्या खोकल्याविरुध्दची लस नसते. कारण चौथ्या वर्षानंतर डांग्या खोकला होण्याची शक्यता कमी असते. चौथ्या वर्षाच्या बूस्टरसाठी द्विगुणी लसीची इंजेक्शने व पोलिओ डोस देतात.

काही कारणांनी मुलाला तिस-या वर्षापर्यंत कुठलीच लस दिलेली नसेल तर प्रत्येक महिन्यात एक अशी द्विगुणी लसीची तीन इंजेक्शने व पोलिओ डोस द्यावे. एक वर्षाने दोन्हींचे बूस्टर व पाचव्या वर्षी दुसरा बूस्टर द्यावा.

लसीकरणाचे वेळापत्रक

रोगप्रतिबंधक लसींनी आपले आयुर्मान वाढले आहे. देवीसारख्या रोगांचे उच्चाटन झाले आहे. पोलिओसारख्या जायबंदी करणाऱ्या आजारांपासूनही लसी संरक्षण देत आहेत. निरनिराळ्या लसीसाठी निश्चित वेळापत्रक असते. याबद्दल आता आपण माहिती घेऊ या.

भारत सरकारने लसीकरणासाठी एक वेळापत्रक सांगितले आहे. यात क्षयरोग, पोलिओ, घटसर्प, डांग्याखोकला, धनुर्वात, गोवर, बी प्रकारची कावीळ या सात आजारांविरुद्ध लसी आहेत. मात्र भारतीय बालरोगतज्ञ परिषदेने (भा.बा.प.) आणखी काही लसी सांगितल्या आहेत. पुढे लसीचे नाव, महिना आणि डोसक्रमांक दिला आहे.

1. जन्मल्यावर बी.सी.जी., तोंडी पोलिओ थेंब क्र 0. (परिषद बी कावीळ क्र 1 देखील देते )
2. सहा आठवडे, त्रिगुणी 1 आणि तोंडी पोलिओ 1, बी कावीळ 1 (बालरोगतज्ञ परिषद या वेळी बी कावीळ 2 आणि हिब 1 देखील देते.)
3. दहा आठवडे–त्रिगुणी 2, तोंडी पोलिओ 2, बी कावीळ 2 (बालरोगतज्ञ परिषद बी कावीळ 2 आणि हिब 2 देखील देते.)
4. चौदा आठवडे–त्रिगुणी 3, तोंडी पोलिओ 3, बी कावीळ 3 (बालरोगतज्ञ परिषद बी कावीळ 3 आणि. हिब 3 देखील देते.)
5. नऊ महिने- गोवर 1 डोस
6. 16-24 महिने त्रिगुणी बुस्टर 1, पोलिओ बुस्टर 1 (बालरोगतज्ञ परिषद हिब बुस्टर आणि एम. एम. आर लस देते.) एम.एम. आर म्हणजे गालगुंड, गोवर, आणि जर्मन गोवर एकत्रित लस.
7. दोन वर्षें (परिषद विषमज्वर लस देते ही लस दर तीन वर्षांनी घ्यायची आहे.)
8. पाच वर्षें द्विगुणी बुस्टर 2 (बालरोगतज्ञ परिषद त्रिगुणी बुस्टर 2 देते. तसेच तोंडी पोलिओ 5 आणि एम.एम.आर 2 देते.)
9. दहा वर्षें-धनुर्वात बुस्टर
10. सोळा वर्षें- धनुर्वात बुस्टर
11. गरोदर स्त्रियांसाठी-धनुर्वाताचे महिन्याच्या अंतराने 2 डोस.पुढच्या बाळंतपणात धनुर्वात फक्त 1 डोस.

 • बालरोगतज्ञ परिषद सूचित लसीमुळे थोडा खर्च वाढतो हे खरे. पण जादा संरक्षण मिळते. परवडण्याचा विचार अवश्य करावा.
 • बालरोगतज्ञ परिषद तोंडी पोलिओच्याबरोबर पोलिओ लसीचे इंजेक्शनपण द्यायची शिफारस करते. यामुळे पोलिओपासून 100% संरक्षण मिळते.
 • खर्चाच्या दृष्टीने आपण सरकारी वेळापत्रकात फक्त एम.एम.आर. लसीची भर घातली तरी काम भागू शकते. बी. कावीळ दिली नाही तरी चालते.

मुले आणि किशोरींसाठी आणखी काही लसी
आता काही नवीन लसीमुळे विशेष आजारांविरुद्ध संरक्षण मिळू शकते. खर्चाचा विचार करून त्या घ्यायला हरकत नाही.

 • पी.सी.व्ही. 7 ही लस सहाव्या आठवड्यानंतर घ्यावी. याने न्यूमोनिया, मेनेंजायटीस आणि कानात पू होण्यापासून संरक्षण मिळते.
 • कांजिण्या लस. ही लस 15व्या महिन्यानंतर घ्यावी.
 • अ कावीळ, 18व्या महिन्यानंतर घ्यावी.
 • बालअतिसाराविरुद्ध रोटाव्हायरस लस सहा आठवड्यानंतर घेता येते.
 • गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध 14-18 वयोगटात मुलींनी एच.पी.व्ही. लस घ्यायला हरकत नाही.
विशेष सूचना
 • सरकारी लसी सर्व मुलांना मोफत उपलब्ध आहेत. आरोग्यकेंद्रात लसीकरणाचे छापील वेळापत्रक आणि माहिती मिळेल.
 • प्रत्येक लसीच्या वेळेला आरोग्य कर्मचारी व डॉक्टर सांगतील तो सल्ला नीट समजून त्याप्रमाणे काळजी घ्या.
 • काही लसीनी सौम्य ताप येतो. याने काळजीचे कारण नाही. शंका असल्यास आरोग्यसेवकांना विचारा.
 • सर्व लसी विशिष्ट थंड तपमानात राखाव्या लागतात. नाहीतर त्या निकामी होतात. शीतकरणाबद्दल शंका वाटत असेल तर आरोग्यसेवक-डॉक्टर यांना विचारून खात्री करा.
 • एखादी लस घ्यायला उशीर झाला तर आरोग्यसेवकांना विचारा. ते तुम्हाला लस कधी घेता येईल हे सांगतील.
 • लसीकरणाबरोबर मुलांना अ जीवनसत्वाचा डोसपण दिला जातो. हा डोस दर 6 महिन्यांनी घ्यायचा असतो. पण वेळापत्रकामुळे तो 6 महिने, एक वर्ष, दीड वर्ष याचवेळी दिला जातो. या जीवनसत्वामुळे बालकाचे डोळे निरोगी राहतात आणि प्रतिकारशक्ती वाढते.
 • आपल्या गावातल्या, वॉर्डातल्या 100% बालकांचे लसीकरण झाले पाहिजे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.