घरीच बाळंतपण करायचे ठरले असेल तर खालीलप्रमाणे तयारी ठेवणे आवश्यक आहे. (मात्र शक्यतोवर घरी बाळंतपण करू नये)
बाळंतपणानंतर आई व बाळ या दोघांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. बाळाचे व आईचे आरोग्य सांभाळण्यासाठी घरभेटी करणे आवश्यक असते. या घटकात आपण आरोग्यमित्र म्हणून काय करू शकतो हे दिले आहे.
बाळंतपणानंतरचे सहा आठवडे आई व बाळाच्या दृष्टीने अगदी महत्त्वाचे असतात. आईच्या शरीरात अनेक बदल होतात. गर्भाशय हळूहळू पूर्वीसारखे लहान होते. अंगावर वाढत्या प्रमाणात दूध येऊ लागते. वजन थोडे कमी होते. याच काळात बाळाला अनेक आजार होऊ शकतात व अनेक बाबतींत सल्ला लागतो. म्हणून बाळ- बाळंतिणीला बाळंतपणानंतरचे सहा आठवडेपर्यंत किमान दोन-तीन वेळा भेट देणे आवश्यक आहे. पहिल्या तीन दिवसांत निदान एक भेट व्हावी. ताप आल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवा.
बाळंतपणानंतरचे आठ-दहा दिवस अंगावरून जात राहते. सुरुवातीस एक-दोन दिवस रक्त, त्यानंतर लालसर पाणी, त्यानंतर पिवळसर पाणी आणि अशा क्रमाने स्त्राव येतात. त्यानंतर स्त्राव पूर्णपणे थांबतात. दुर्गंधी येत असेल तर जंतुदोषाची शक्यता लक्षात घ्यावी.
मेथर्जिनच्या गोळया पाच दिवस दिल्यास गर्भाशय आकसून लहान व्हायला मदत होते. लोह गोळया व कॅल्शियम देणेही भरपाईसाठी आवश्यक आहे. चांगला आहार, विश्रांती व ओटीपोटाचे व्यायाम होणे आवश्यक आहे.
बाळंतपणानंतर खालील त्रास आढळल्यास ताबडतोब रुग्णालयात पाठवा:
पोटात दुखणे – प्रसूतीनंतर एक-दोन दिवस पोटात दुखण्याची शक्यता असते. हे दुखणे गर्भाशयाच्या हालचालीमुळे होते. ऍट्रोपीनच्या गोळयांनी हे दुखणे थांबते.
बध्दकोष्ठ – सौम्यरेचक (त्रिफळा चूर्ण) घेण्याने हे कमी होते.
लघवी अडकणे – गर्भाशयाच्या दाबामुळे लघवी अडकते. आधी गरम पाणी ओटीपोटावरून ओतून पहा. याने कदाचित लघवी मोकळी होईल. याने नाही झाली तर नळी घालून लघवी बाहेर काढावी लागेल. मात्र 24 तासांपेक्षा अधिक काळ लघवी झाली नसेल तर रुग्णालयात न्यावे हे बरे.
मूळव्याध – सौम्यरेचक (उदा.त्रिफळा चूर्ण) वापरावे. दुख-याजागी दिवसातून दोन-तीन वेळा गरम पाण्याचा शेक आणि मऊपणासाठी खोबरेल तेल लावून वेदना कमी करता येतात. हळूहळू हा बाळंतपणाचा मूळव्याध आपोआप कमी होतो.
जखम – योनिमार्गाला जखम झाली असल्यास जंतुनाशक मलम दिवसातून दोन-तीन वेळा लावावे. मुख्य म्हणजे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. जंतुविरोधी औषधे (उदा. कोझाल) घेतल्यामुळे जखम लवकर भरते. त्रिफळा व कडूनिंब धावनाबद्दल यापूर्वीच सांगितले आहे.
स्तनाच्या बोंडावरचा कोरडेपणा, चिराळणे – हा भाग नाजूक असल्याने काळजी घ्यावी लागते. नाहीतर पुढे जखमा होऊन रक्त येते. नुसता कोरडेपणा असेल तर खोबरेल तेल किंवा गाईचे तूप लावून मऊपणा येतो. बोंड चिराळलेले असेल तर मात्र त्या बाजूला बाळाला पाजण्याचे एक दोन दिवस थांबवावे. व दूध पिळून काढून पाजावे. बाळाला केवळ दुस-या बाजूचे दूध पुरत असल्यास याची गरज नाही. पण दिवसातून दोन-तीन वेळा तरी आतले दूध काढले पाहिजे, नाहीतर गाठी होतात. तीन-चार दिवसांत बोंड बरे होते.
स्तनात जडपणा येणे – दुधाचा निचरा न होता ते आत साठते. गाठी होतात व पुढे त्यात पू होतो. म्हणून दिवसातून दोन-तीन वेळा स्तन मोकळे होणे आवश्यक आहे.