femaleurine system icon स्त्रीजननसंस्था पुरुषजननसंस्था
योनिदाह

Vaginal Dermatitis योनिदाह म्हणजे योनिमार्गाच्या आतल्या नाजूक त्वचेचा दाह. योनिदाहाची कारणे अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे आणि जास्त आढळणारे प्रकार म्हणजे बुरशी, जिवाणू आणि ट्रायकोमोनास (एकपेशीय जीव) यामुळे होणारे योनिदाह.

योनिमार्गात काही जैवरासायनिक कारणांमुळे सतत आम्लता असते. या आम्लतेमुळे योनिमार्गात सहसा इतर जंतू वाढू शकत नाहीत. एका विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजंतूंच्या (लॅक्टोबॅसिलस) कायमच्या वस्तीमुळे अशी आम्लता राहते. गरोदरपण, बाळंतपणानंतरचा काही काळ, पाळी कायमची थांबल्यानंतरचा काळ हे कमी आम्लतेचे असतात. म्हणून या तीन काळात जंतुदोष होऊ शकतो.

बुरशी, जिवाणू आणि ट्रायकोमोनास शिवाय आणखी काही जंतू विशिष्ट परिस्थितीत योनिमार्गात वाढू शकतात. परमा (गोनोरिया) या लिंगसांसर्गिक रोगजंतूमुळे कधीकधी योनिदाह होऊ शकतो. गर्भाशयाचा कर्करोग, ओटीपोटाच्या शस्त्रक्रिया, मधुमेह, इत्यादी कारणांनी इतर जंतुदोष होऊ शकतात.

रोगनिदान

शक्यतो या दाहाचे नेमके कारण व प्रकार ओळखणे आवश्यक असते. कुस्को योनिदर्शकाच्या तपासणीत हा स्राव दिसून येतो. योनिदर्शकाच्या चमच्यासारख्या भागावरही हा स्राव आपोआप येतो, तो तपासावा.

अंगावरून पाणी जाणे (प्रदर) व खाज सुटणे ही योनिदाहाची प्रमुख लक्षणे आहेत. याला कधीकधी दुर्गंधी (विशेषतः ट्रायकोमोनास प्रकारात) येते. आतून तपासणी केल्यावर योनिदाहाचा प्रकार समजू शकतो.

बुरशीजन्य योनिदाहात दह्यासारखा चिकट जाड स्राव येतो व आतली त्वचा सरसकट लालसर दिसते.

ट्रायकोमोनास प्रकारात हा स्राव हिरवट-पिवळट, दुर्गंधीयुक्त, फेसकट असतो व खाजही भरपूर असते. यात आतल्या त्वचेवर बहुधा मोहरीइतके लालसर रक्ताळलेले ठिपके असतात. कधी कधी लघवीस जळजळ होते. या योनिदाहाबरोबर (ट्रायकामोनास) इतर जंतुदोषही आढळण्याची शक्यता असते.

याशिवाय इतर प्रकारचे जंतुदोष म्हणजे शरीरात इतर ठिकाणी ‘पू’ निर्माण करणारे किंवा अन्नमार्गातील जिवाणू असतील तर ओळखणे जरा अवघड जाते. अशा प्रकारचे इतर ‘जंतुदोष’ बाळंतपणानंतर किंवा
जखमांबरोबर येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंगावरून पांढरे-पिवळे स्राव जाण्याची तक्रार असेल तर आतून तपासणी केल्याशिवाय निष्कर्ष काढू नये. स्राव/पाझर जाण्यामागे योनिदाह सोडून इतरही कारणे असतात, उदा. गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग, गर्भनलिकांचे जंतुदोष, इ. अंगावरून स्राव म्हणजे योनिदाह असे समीकरण करणे चुकीचे आहे. गरज वाटल्यास डॉक्टरकडे पाठवून निश्चित निदान करता येईल.

उपचार

योनिदाहाचा प्रकार ठरवून उपचार करावेत.

योनिदाह बुरशीजन्य किंवा अन्य जंतुदोषांमुळे असेल तर जेंशन (व्हायोलेट) औषध बोळयाने आतून आठवडाभर दिवसाआड लावल्यास आराम पडतो. मात्र जेंशन हे सौम्य औषध आहे.

  • ट्रायकोमोनास हे कारण असेल तर पोटातून .मेझोलच्या गोळया (1000 मि. ग्रॅ. डोस फक्त 1 दिवस ) घेणे हाच चांगला उपाय आहे. हा प्रकार फक्त औषध लावून बरा होत नाही. पण इतरही जंतुदोष असतात म्हणून जेंशन औषध लावणे हे योग्य ठरेल.
  • दोन्ही प्रकारांत आतून लावण्यासाठी प्रोव्हिडोन आयोडिन हे औषध काही प्रमाणात उपयोगी ठरते.
  • घरगुती उपचार: योनिधावन करून योनिमार्गात थोडे वर लसणाची पाकळी ठेवल्यास (रोज 2-3 दिवस) बुरशीदाह बरा होतो. लसणाऐवजी आठवडाभर रोज दही आतून लावण्यानेही आराम पडतो.
  • ट्रायकामोनास योनिदाह असल्यास योनिधावन करून, कडुनिंब पाला कुटून त्याची ओली पुरचुंडी (स्वच्छ कापडात) रात्री योनिमार्गात थोडी वर ठेवावी. दुस-या दिवशी सकाळी पुरचुंडी बदलावी. याने लवकर आराम पडतो.
  • योनिदाह वारंवार होत असल्यास लघवीची साखरेसाठी तपासणी करून मधुमेहाची शक्यता तपासली पाहिजे.
  • इतर काहीही त्रास, ओटीपोटात गाठ दुखरेपणा असल्यास तज्ज्ञाकडे पाठवावे.
  • ट्रायकोमोनास, बुरशी यांमुळे होणारा योनिदाह लिंगसांसर्गिक असल्याने जोडीदाराची तपासणी व उपचार होणे आवश्यक असते. नाहीतर आजार जोडीदारांमध्ये फिरत राहील.
होमिओपथी निवड

एपिस, आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब,सीना, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, पल्सेटिला, -हस टॉक्स, सेपिया, सिलिशिया, सल्फर

स्तनांचे आजार

पुरुषामध्ये स्तन नावापुरतेच असतात. म्हणूनच पुरुषांमध्ये स्तनांचे आजार क्वचितच होतात. क्वचित पुरुषांमध्येही स्तनांमध्ये गाठ किंवा कर्करोग होऊ शकतो.

स्त्रियांमध्ये स्तनांचा आकार मोठा असल्याने आणि स्तनपानात त्यांचे प्रत्यक्ष काम असल्याने निरनिराळे आजार होतात. स्तनाची रचना म्हणजे संत्र्याप्रमाणे अनेक कप्पे असून त्यात मुख्यतः चरबी व दूध निर्माण करणा-या ग्रंथी असतात. प्रत्येक कप्प्यात दूध बोंडाकडे आणणारे दुग्धवाहिन्यांचे जाळे असते. दूध निर्माण करण्याची क्रिया स्तनपानाच्या काळात अखंडपणे वर्ष-दीड वर्ष चालू असते. यात मुख्यतः तीन प्रकारचे आजार आहेत. (1) दुधाच्या गाठी व जंतुदोष-गळू, इ., (2) स्तनांमधल्या साध्या गाठी, (3) स्तनांचा कर्करोग.

दुधाच्या गाठी व जंतुदोष

बोंडाला चीर पडली असेल तर दुखरेपणामुळे त्या बाजूला कमी पाजले जाते. यामुळे दुधाची गाठ बनू शकते व त्यात जंतुदोष होऊ शकतो.

कधीकधी एखाद्या स्तनातले किंवा स्तनाच्या भागातले दूध बाहेर न पडता आतच राहते. इथे आधी दुधाची गाठ तयार होते. या दुधाच्या गाठी सुरुवातीला मऊ असतात, पण चार-पाच तासांतच फुगून घट्ट होतात. दुधाची गाठ असून स्तन पिळून दूध काढले नाही तर त्यात बाहेरून जंतू शिरून गळू तयार होते.

एकदा जंतुदोष झाला, की त्या बाजूचा स्तन आकाराने मोठा व कडक होतो. या स्तनावर गरमपणा व दुखरेपणा आढळतो. दोन-तीन दिवसांत गळवावरची त्वचा ताणली जाते आणि आतल्या पुवामुळे तिथे पांढरटपणा दिसतो, जर गळू आत खोलवर असेल तर मात्र असा पांढरटपणा कदाचित आढळणार नाही. एकदा पू झाल्यावर शस्त्रक्रिया करून पू बाहेर काढणे आवश्यक असते.

स्तनपान चालू असताना स्तनात अशा गाठी व जंतुदोष होऊ शकतो. दुधाची गाठ होणे ही थोडी टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. यासाठी दोन्ही बाजूंना पाजणे व राहिलेले दूध रोज पिळून काढणे आवश्यक असते.

अर्भक मृत्यू झाल्यास औषधाने दूध येण्याचे बंद करता येते. (स्टिलबेस्ट्रॉल गोळी सकाळी-सायंकाळी एकेक याप्रमाणे पाच दिवस ) अशा वेळीही उरलेल्या सर्व दुधाचा निचरा होणे आवश्यक असते.

स्तनातल्या साध्या गाठी

या गाठी सहसा मध्यम वयात येतात. त्या आकाराने हळूहळू वाढतात. स्तनामध्ये ही गाठ बोटाने धरण्याचा प्रयत्न केल्यास ती हातातून सटकते. पण ही साधी गाठ आहे, की कर्करोगाची आहे हे ठरवणे अवघड असते. त्यासाठी ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवणे चांगले. स्तनाच्या कर्करोगाचे निदान उशिरा झाले तर पुढे उपचार जास्त किचकट होतात.

स्तनांचा कर्करोग

Breast हाताला टणक लागणारी आकाराने वेडीवाकडी असलेली व न दुखणारी गाठ कर्करोगाची असण्याची शक्यता असते. काही काळानंतर ही गाठ स्तनाखालच्या स्नायूंपर्यंत पोचते. मग ती स्नायूंमध्ये मूळ धरते. कधीकधी वरच्या त्वचेलाही ही गाठ चिकटते. याबरोबरच त्या बाजूच्या काखेत कर्करोगाचे अवधाण येते. या गाठीही टणक लागतात. या अवस्थेत शस्त्रक्रिया करणे अवघड असते व तसे फायद्याचे नसते. कर्करोग नुसत्या गाठीच्या अवस्थेतच शोधणे आवश्यक असते. स्नायूंपर्यंत किंवा अवधाण येण्यापर्यंत वाढ झाल्यास जीवनाला आज ना उद्या धोका असतो. जवळजवळ निरुपाय होतो. स्तनाच्या कर्करोगाच्या प्रकाराप्रमाणे शस्त्रक्रिया, रासायनिक औषधे, किरणोपचार करावे लागतात.

स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांसाठी महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतात याचे प्रमाण जास्त आहे. पण वाईटात चांगले म्हणजे आपण तो लवकर शोधून काढू शकतो.

कारणे

हा कॅन्सर स्त्रियांना 35-55 या वयात होण्याची शक्यता असते. याची कारणे पुढीलप्रमाणे – स्थूलता म्हणजे चरबी वाढणे, स्तनभार जास्त असणे, खाण्यामध्ये तेल-तूप जास्त असणे, संततीप्रतिबंधक गोळ्यांचा दीर्घ वापर, अपत्य नसणे. यात काही आनुवंशिक कारणेपण असतात.

ज्या स्त्रिया एकूणच स्तनपान कमी करतात त्यांना कर्करोगाचा धोका थोडा जास्त असतो.

रोगनिदान
  • न दुखणारी छोटी गाठ किंवा गोळ्याने स्तन कर्करोगाची सुरुवात होते. नंतर स्तनांमध्ये दुखरेपणा आणि बोंडावर थोडा रक्तमिश्रित स्त्राव होऊ शकतो. त्या स्तनाचे बोंड ओढलेले किंवा संकुचित असू शकते. काखेमध्ये गाठी असतील तर मात्र कर्करोग वाढल्याची खूण आहे.
  • आपण आपल्या स्तनांची दरमहा एकदा तरी हाताने चाचपणी करणे चांगले. यासाठी घड्याळाच्या दिशेप्रमाणे क्रमश: स्तन तपासा. यात एखादी गाठ किंवा गोळा जाणवला तर ते महत्त्वाचे आहे. अर्थात प्रत्येकच गाठ किंवा गोळा कर्करोग नसतो नाही हेही लक्षात ठेवा.
  • नक्की खात्री करण्यासाठी त्या गाठीचा नमुना घेऊन सूक्ष्मदर्शक तपासणी करावी लागते. सुईने हा नमुना घेता येतो.
  • मॅमोग्राफी या एक्स-रे चित्रातून स्तनातील छोट्या गाठीही शोधता येतात. ही तपासणी चाळीशीनंतर जास्त भरवशाची असते.
  • एम.आर.आय तपासणी ही जास्त चांगली पण खर्चिकही असते.

योनिद्वारावर खाज सुटण्याची कारणे अनेक असतात. त्यात मुख्य आंतरिक गट म्हणजे योनिमार्गातून येणा-या स्राव व दाह यांमुळे येणारी खाज. दुसरा गट म्हणजे खुद्द योनिद्वाराचे आजार.

स्तन-कर्करोगाचे उपचार

स्तन कर्करोगाचा प्रकार आणि प्रसार यावर उपचार अवलंबून असतात. आपले डॉक्टर याबद्दल योग्य तो सल्ला देतील. इथे याबद्दल थोडी माहिती घेऊ या.

  • कर्करोगाच्या छोट्या गाठी काढून टाकता येतात. अशा वेळी उरलेला स्तन काढण्याची गरज नसते.
  • मात्र गाठ मोठी असली तर तो स्तन आणि काखेतील गाठी काढाव्या लागतात. या शस्त्रक्रियेनंतर किरणोपचार लागू शकतील.
  • स्तन कर्करोगासाठी शस्त्रक्रियेनंतर कॅन्सरविरोधी औषधयोजना केली जाते. सामान्यत: याच्या 6 फेऱ्या असतात. याशिवाय संप्रेरक आणि प्रतिघटक -अँटीबॉडी – उपचारही लागतात. यामुळे परत कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
  • हा कर्करोग शरीरात पसरू नये यासाठी औषधोपचार आवश्यक असतात.
विशेष सूचना
  • सर्व स्त्रियांनी स्वत:च्या स्तनांची तपासणी करायला शिकायला पाहिजे. आपण आपली तपासणी पाळीनंतर चार-पाच दिवसांनी करावी. किंवा तपासणी महिन्याच्या ठरावीक तारखेला करावी. शंका आल्यास डॉक्टरांना भेटावे.
  • रजोनिवृत्तीनंतर दरवर्षी मॅमोग्राफी तपासणी करणे चांगले.
  • स्तन कर्करोग वेळीच काढला तर पुढे आयुष्यात तो परत होण्याचा धोका कमी होतो. पण यासाठी कर्करोगाचा प्रकारही महत्त्वाचा असतो.
  • निस्तेजपणा किंवा वजन घटणे हे कर्करोग बळावल्याचे चिन्ह असू शकते.
  • मॅमोग्राफी तपासणीतही 10-15% बाबतीत निदान चुकू शकते. स्तनभार जास्त असेल तर चुकण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच वयाच्या पस्तीशी पर्यंत मॅमोग्राफी तपासणी फारशी भरवशाची नाही.
  • शिवाय क्ष किरण हे स्वत:च काही अंशी कर्करोगजनक ठरू शकतात. त्यामुळे मॅमोग्राफी तपासणीही आवश्यक तेव्हाच केली पाहिजे.
योनिद्वाराची खाज
कारणे

Uterus Mouth योनिद्वारावर खाज सुटण्याची कारणे अनेक असतात. त्यात मुख्य आंतरिक गट म्हणजे योनिमार्गातून येणा-या स्राव व दाह यांमुळे येणारी खाज. दुसरा गट म्हणजे खुद्द योनिद्वाराचे आजार.

  • आंतरिक आजार : आतून बाहेर पसरलेली खाज, उदा. योनिदाह, गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग, लिंगसांसर्गिक रोग, इत्यादींमुळे होणारी योनिद्वाराची खाज.
  • योनिद्वाराचे आजार : यांमध्ये खरूज, गजकर्ण, उवा, आतडयातल्या जंतूंमुळे (सूतकृमी) गुदद्वार व योनिद्वारावर येणारी खाज, जखमा (उदा. बाळंतपण किंवा लैंगिक संबंधामुळे तयार होणा-या जखमा), केसांच्या मुळाशी तयार होणा-या गाठी, वावडे, मधुमेहामुळे येणारे जंतुदोष, इत्यादी निरनिराळे आजार आढळतात.

यासाठी योनिद्वाराची आणि योनिमार्गाची तपासणी केल्यावर बहुधा ताबडतोब आजार समजतो. मधुमेह तपासणीसाठी मात्र लघवीतील आणि रक्तातील साखरेसाठी तपासणी करावी.

उपचार

रोगनिदान झाल्यानंतर मूळ आजारावर (उदा. खरूज असल्यास खरजेचे गॅमा मलम) उपचार करावेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साध्या साबणपाण्याने योनिद्वाराची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. केस काढून टाकल्यावर स्वच्छता ठेवणे व औषध लावणे सोपे जाते.

कडुनिंबाच्या काढयाने सकाळी व रात्री झोपताना धुऊन स्वच्छता केल्याने किरकोळ कारणे बरी होतात.

योनिदाह – आयुर्वेदिक निदान व उपचार (तक्ता (Table) पहा)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.