bonecells iconअस्थिसंस्थेचे आजार
अस्थिविरळता

अस्थिविरळता म्हणजे हाडांमधील घनता कमी होऊन ती विरळ आणि दुबळी होणे. यामध्ये हाडांमधल्या रेषा-रेषांची रचना विरळ होत जाते आणि चुनाही कमी होत जातो. यामुळे हाडे दुबळी होऊन लवकर मोडतात. भारतात या आजाराचे प्रमाण खूप असून उतारवयात अस्थिभंग होण्याचे प्रमाण त्यामुळेच वाढते. खुबा, मणके, मनगट आदि अस्थिभंग यामुळेच जास्त प्रमाणात होतात. स्त्रियांना पाळी थांबल्यावर हा आजार होण्याची दाट शक्यता असते. पण थोडयाशा माराने सहज अस्थिभंग होईपर्यंत हे कळून येत नाही. याला इतरही बरीच कारणे आहेत.

कारणे

हा आजार खालील कारणांनी होतो.

  • स्त्रियांना पाळी थांबल्यावर होतो.
  • उतारवयात स्त्री-पुरुषांना होतो.
  • कुपोषणामुळे प्रथिने व चुना कमी पडल्यामुळे होतो.
  • दारुचे व्यसन – यामुळे आहार कमी पडून
  • निरनिराळया संप्रेरक ग्रंथींच्या आजारांमुळे शरीरात चुना कमी पडतो.
  • निवडक औषधांमुळे शरीराला चुना कमी पडतो.
  • अंथरुणाला खिळून राहिल्यामुळे
  • कॉफी, धूम्रपान यामुळे चुना कमी होतो.
  • अनेक बाळंतपणे होणे, तीही लागोपाठ होणे.
  • मधुमेहाचा आजार.

भारतात यातली पहिली दोन कारणे सर्वात जास्त आढळतात.

लक्षणे व चिन्हे

हा आजार अगदी सावकाश सुरु होतो. बहुधा हा आजार कळून येत नाही. थोडयाशा माराने अस्थिभंग होणे हेच याचे पहिले दर्शन असते.

कधीकधी सूक्ष्म अस्थिभंगामुळे पाठीच्या कण्यात वेदना होते. पण याकडे दुर्लक्ष होऊ शकते.

रोगनिदानासाठी विशेष तपासणी

हा आजार रक्त तपासणीतही लवकर कळून येत नाही. रक्तातल्या कॅल्शियमचे प्रमाण ठरावीकच असते. क्ष-किरण चित्रात अस्थिविरळता दिसून यायलाही बराच उशीर होतो. म्हणजे एकूण चुन्यापैकी 30-50% चुना कमी झाल्यावरच क्ष-किरण चित्रात विरळपणा दिसायला लागतो.

प्रतिबंध
  • पाळी थांबल्यावर म्हणजे 45-50 वयोगटात स्त्रियांना चुना-कॅल्शियम आणि प्रथिनयुक्त आहार देणे. (स्त्री-संप्रेरकांची जोड देणे चांगले पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे.)
  • उतारवयात स्त्री-पुरुषांनी कॅल्शियम व प्रथिने आहारात योग्य प्रमाणात घेत राहिले पाहिजे.
  • उंचीच्या तुलनेत वजन कमी असणे हा एक धोक्याचा कंदील असू शकतो. म्हणजे बॉडी मास इंडेक्स (शरीर -भार निर्देशांक) 17 पेक्षा खाली असल्यास अस्थिविरळतेची शंका घ्यावी.
प्रतिबंधासाठी
  • रोज निदान एक ते दीड ग्रॅम कॅल्शियम (चुना) आहारात असावा.
  • याबरोबर रोज 400-800 युनिट ‘ड’ जीवनसत्व घ्यावे.
  • योग्य दैनंदिन व्यायाम. यात भारवाहक व्यायाम महत्त्वाचे असतात. (उदा. गुरुत्वाकर्षणाविरोधात केलेले व्यायाम)
  • दूध-दही हे विशेष उपयोगी अन्नपदार्थ आहेत. अंडयामध्येही कॅल्शियम असते. धान्ये – विशेषत: नाचणी, बाजरी यात कॅल्शियम असते. आपल्या आहारात रोज यांचा समावेश असावा.
मुडदूस

मुडदूस हा आजार आता पुष्कळ कमी झाला आहे.

1-2 वर्ष वयाच्या मुलांना जीवनसत्त्व ‘ड’ कमी पडले तर मुडदूस हा विकार होतो. हा मुख्यतः हाडांचा आजार असून त्यात हाडे व स्नायू दुबळे होऊन वाढ खुंटते. कपाळाचे हाड फुगणे, मनगटाची हाडे जाड होणे, पायांना बाक येणे, पोट मोठे दिसणे, इ. लक्षणे दिसतात. बरगडया आणि छातीचे मधले हाड यांचे सांधे सुजल्यासारखे मोठे दिसतात. त्यामुळे गळयात एक माळच घातल्याप्रमाणे दिसते (याला ‘मुडदूस माळ’ असे म्हणता येईल.) अशीच माळ जीवनसत्त्व ‘क’ कमी पडल्यानेही होते, मात्र त्यावर दाबल्याने दुखरेपणा जाणवतो तसा मुडदूस माळेत जाणवत नाही. या आजारात मुलांना श्वसनसंस्थेचे आजार वारंवार होतात.

जीवनसत्त्व ‘ड’ चा डोस दुधात मिसळून पाजणे हा यावरचा चांगला उपाय आहे. मात्र एकदा हाडांचा आकार बदलला की तो आजार कमी झाल्यावरही तसाच राहतो. वयाच्या दोन वर्षांनंतर मुले सूर्यप्रकाशात हिंडायला लागतात. त्यामुळे मुडदूस 2 वर्षे वयानंतर राहत नाही.

उशिराचा मुडदूस

प्रौढ स्त्रियांमध्ये पण जीवनसत्त्व ‘ड’ कमी पडू शकते, विशेषकरून गरोदरपणात असे होऊ शकते. अशा स्त्रियांना हाडे दुखणे, स्नायूंचा अशक्तपणा, कमरेच्या हाडांमध्ये विकृती (वाकडेपणा), इ. त्रास होतो; बाळंतपण अवघड जाते. अशी हाडे दुबळी आणि मऊ होतात आणि सहजपणे मोडतात. अशा मातांच्या दुधातही जीवनसत्त्व ‘ड’ कमी असते म्हणून त्यांच्या बाळांनाही लवकर मुडदूस होतो. उपचार म्हणून जीवनसत्त्व-ड, चुना (कॅल्शियम) व रोज अर्धा तास सूर्यप्रकाशात थांबणे एवढे पुरते.

असाच आजार वृध्द माणसांनाही होऊ शकतो.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.