digestive system icon पचनसंस्थेचे नेहमीचे आजार पचनसंस्थेचे गंभीर आजार
भेसळीची काही नेहमीची उदाहरणे
  • दुधात पाणी मिसळणे किंवा त्यातील चरबी काढून घेणे.
  • शुध्द तुपात किंवा लोण्यात वनस्पती तूप मिसळणे.
  • लोण्यात पाणी जास्त प्रमाणात ठेवणे (वजन वाढण्यासाठी)
  • हळद पावडरीत एक विषारी पिवळा रंग मिसळणे.
  • मिरची पावडरीत (लाल तिखट) लाकडाचा भुसा, विटांची पावडर किंवा इतर पावडर मिसळणे.
  • हिंग खडयाबरोबर (किंवा खडयाच्या ऐवजी) इतर खडे विकले जातात.
  • रव्यामध्ये वजन वाढवण्यासाठी लोखंडाचा चुरा मिसळला जातो.
  • धान्यामध्ये खडे, किडके धान्य यांचे प्रमाण जास्त असेल तर ती भेसळ समजा.
  • मोहरीमध्ये धोत-याचे बी मिसळले जाते व ते विषारी असते. (धोत-याचा दाणा एका बाजूला त्रिकोणी असतो व मोहरीपेक्षा साधारणपणे लहान असतो.)
  • चहाच्या पावडरीमध्ये लाकडाचा भुसा वा एकदा वापरलेली चहापूड मिसळतात.
  • डाळींना कृत्रिम रंग देऊन आकर्षक केले जाते. हे रंग अपायकारक असतात.
  • खाद्यपदार्थात धुण्याचा सोडा घातला जातो. त्यामुळे आतडयांना इजा होते.
  • खाद्यतेलात विषारी तेले मिसळल्यामुळे अपंगत्व येण्याची शक्यता असते.
  • अरगटयुक्त बाजरी विकणे हाही गुन्हा आहे व त्यामुळे विषबाधा होऊ शकते. (सूचना : मिठाच्या पाण्यात अरगटयुक्त बाजरीचे दाणे तरंगतात व चांगले दाणे खाली जातात)
  • पिठीसाखरेत सोडा मिसळला जातो.
  • बेसन पिठात लाखी डाळीचे पीठ (एक विषारी डाळ) मिसळले जाते.
  • जिरे किंवा बडेशेप यामध्ये गवताचे बी मिसळले जाते. (सूचना : जि-याच्या दाण्यांवर बारीक रेघा असतात)
  • लवंग, दालचिनी वगैरे मसाल्याच्या पदार्थाचा अर्क काढून घेतात व निःसत्त्व माल बाजारात विकला जातो, हीही एक प्रकारची भेसळच आहे.
  • प्यायच्या दारूमध्ये स्पिरीट किंवा आणखी काही विषारी पदार्थ मिसळतात. (वास्तविक ही ‘अन्नभेसळ’ नाही, पण भेसळीचे घातक उदाहरण आहे.)
अन्नभेसळ – घरगुती तपासणी

दूध – दूधामध्ये पाणी मिसळणे ही सामान्य तक्रार असते. यासाठी दुधाचा एक थेंब गुळगुळीत स्वच्छ उभ्या पृष्ठभागावर लावला तर शुध्द दुध तेथेच ठिपक्याप्रमाणे राहते. किंवा खाली ओघळून पांढरा पट्टा दिसतो. मात्र पाणी घातलेले दुध ताबडतोब खाली ओघळते आणि त्याचा ओघळ पांढरा दिसत नाही.

दुधामध्ये युरीया हे खत मिसळण्याची धास्ती मोठया प्रमाणावर असते. हे तपासण्यासाठी एका टेस्टटयूबमध्ये पाच मि.ली. दूध घेऊन त्यात ब्रोमोथायमॉल या निळया औषधाचे दोन थेंब टाका. दहा मिनिटांनंतर निळा रंग आल्यास यात युरीया आहे असे समजा.

दुधामध्ये स्टार्च म्हणजे कांजी घातलेली तपासायची असल्यास दुधात 2-3 थेंब टिंक्चर आयोडिन टाकावे. निळा रंग आल्यास स्टार्चची भेसळ आहे असे समजावे.

दुधामधून फॅट (चरबी) काढून घेतली असल्यास लॅक्टोमीटरने 26 च्या वरती रिडिंग येते. पण दुध घट्टच दिसते.

खव्यामध्ये कधीकधी स्टार्च मिसळलेला असतो. खव्याचा थोडा नमुना पाण्यात उकळावा, थंड करावा आणि त्यात आयोडिनचे थेंब टाकावे. निळा रंग आल्यास स्टार्च आहे (पिठूळ पदार्थ) असे समजावे.

पनीरमध्येही कधीकधी स्टार्च मिसळलेला असतो. यासाठी अशीच तपासणी करावी.

तुपामध्ये शिजवलेल्या बटाटयाचा किंवा रताळयाचा गर मिसळला जातो. याची तपासणी खव्याप्रमाणेच आयोडिनचे थेंब टाकून करता येते.

आईसक्रीममध्ये धुण्याची पावडर मिसळली जाते. अशा आईसक्रीममध्ये लिंबाचे काही थेंब टाकल्यास बुडबुडे येतात. धुण्याची पावडर नसेल तर बुडबुडे येत नाहीत.

आईसक्रीमध्ये साखरेऐवजी सॅकॅरीन मिसळलेले असल्यास चवीवरून ते कळते. सॅकॅरीनची गोड चव जीभेवर बराच वेळ राहून नंतर एक कडवट चव शिल्लक राहते.

धान्यामंमध्ये माती, खडे, दगडाचा चुरा, गवत, तणाच्या बिया, किडके धान्य, इत्यादी मिसळले जातात. यात कधीकधी किडे, उंदराचे केस आणि लेंडया सापडतात. ही भेसळ डोळयांनी पाहून समजते. ही भेसळ आरोग्याला घातक आहे.

आटा, मैदा रवा यांमध्ये बारीक वाळू किंवा माती मिसळली जाते. हे डोळयांनी पाहून कळते.

रव्यामध्ये वजन वाढवण्यासाठी लोखंडाचा चुरा मिसळला जातो. लोहचुंबक फिरवून लोखंड वेगळे काढता येते.

पिठीसाखरेमध्ये खडूची पावडर मिसळली जाते. हे तपासण्यासाठी काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात थोडी साखर मिसळा. खडू असल्यास तो खाली तळाला साठतो.

मिठामध्ये खडूची पावडर मिसळली जाते आणि त्यासाठी अशीच तपासणी करावी.

पिठीसाखरेत भेसळीसाठी धुण्याचा सोडा टाकला जातो. या नमुन्यावर सौम्य हायड्रोक्लोरीक आम्ल टाका.त्यातून बुडबुडे आल्यास या नमुन्यात धुण्याचा सोडा आहे असे समजावे.

चांदीचा वर्ख मिठाईमध्ये वापरला जातो. मात्र बरेच मिठाई कारखाने चांदीच्या वर्खाऐवजी ऍल्युमिनियमचा घातक वर्ख वापरतात. हे तपासण्यासाठी हा वर्ख वेगळा काढून ज्योतीमध्ये धरा. वर्ख चांदीचा असेल तर तो वितळून बारीक गोळा बनतो. मात्र ऍल्युमिनियमचा वर्ख जळून करडी काळी राख बनते.

मधामध्ये पाणी साखरपाणी मिसळले जाते. हे तपासण्यासाठी कापसाची एक वात मधात भिजवून ती काडीने पेटवा शुध्द मध छान जळतो. मात्र त्यात पाणी असेल तर वात पेटत नाही किंवा पेटताना चरचर असा पाण्याचा आवाज येतो.

कॉफीमध्ये चिकोरी हा पदार्थ मिसळला जातो. यासाठी एका ग्लासात पाणी घेऊन ही कॉफीची पावडर त्यावर विखरा. कॉफी असल्यास ती पाण्यावर तरंगते. पण चिकोरी काही सेकंदातच तळाला जाते. चिकोरीचे बुडणारे कण बुडताना रंगाच्या रेषा दिसतात.

चहामध्ये इतर वनस्पतींची रंगीत पाने मिसळली जातात. पांढ-या कागदावर हा चहा घासल्यास इतर वनस्पतींना दिलेला रंग कागदावर दिसतो. केवळ चहा असल्यास कागदाला रंग लागत नाही.

चहामध्ये वापरलेली चहापत्ती मिसळली जाते. यासाठी एक फिल्टरपेपरवर 3-4 पाण्याचे थेंब टाकून त्यावर थोडी चहापूड टाकावी. चांगला चहा असल्यास त्यावर लाल-काळे डाग दिसतात. चहा वापरलेला असल्यास रंगीत डाग दिसत नाहीत.

तेलांमध्ये काही वेळी अर्जिमोनतेल मिसळले जाते. हे तपासण्यासाठी तेलाचा नमुना एका टेस्टटयुबमध्ये घेऊन त्यात तेवढचे नायट्रिक ऍसिड टाकून हळूहळू ढवळा. लालसर रंग आल्यास भेसळ आहे असे समजावे.

तेलामध्ये मिनरल ऑईल भेसळ करण्याची उदाहरणे आढळतात. यासाठी तेलाचा 2 मि.ली नमुना टेस्टटयूबमध्ये घेऊन त्यात एन-12 अल्कोहोलिक पोटॅश मिसळावे. ही टेस्टटयूब मिश्रण 15 मिनिटे गरम पाण्यात घालून त्यात 10 मि.ली. पाणी टाकावे. मिनरल ऑईल असेल तर मिश्रण गढूळ दिसते.

खाद्यतेलामध्ये एरंडेल तेल मिसळण्याचे प्रकार असतात. हे तपासण्यासाठी तेलाचा 1 मि.ली. नमुना घेऊन त्यात 10 मि.ली. ऍसिडीफाईड पेट्रोलियम इथर टाकावे आणि ढवळावे. या टेस्टटयूबमध्ये अमोनियम मॉलिबडेटचे काही थेंब टाकावे. पांढरा गढूळ रंग आल्यास एरंडेल तेल मिसळले आहे असे समजावे.

लाल मिरचीच्या पावडरमध्ये रोडामिन मिसळले जाते. हे तपासण्यासाठी एका टेस्टटयूबमध्ये लात तिखटाचे दोन ग्रॅम (अर्धा चमचा) नमुना घेऊन त्यावर 5 मि.ली. ऍसिटोन टाका. (मुली नेलपॉलिश काढण्यासाठी वापरतात तो द्राव ऍसिटोन असतो.) यातून ताबडतोब लाल रंग उठल्यास रोडामिन आहे असे समजा. लाल तिखटात काही वेळा विटकरीचा भुगा मिसळला जातो. यासाठी हे तिखट ग्लासभर पाण्यात टाका. विटकरीचा अंश वेगाने खाली जातो तर मिरचीचे तिखट पाण्यावर बराचवेळ तरंगते आणि हळूहळू खाली जाते.

हळदीमध्ये मेटॅलिन यलो हा अपायकारक रंग मिसळला जातो. यासाठी या हळदीवर हायड्रोक्लोरिक आम्लाचे ४-५ थेंब टाका. या पदार्थात मेटॅलिन यलो पावडर असेल तर ताबडतोब रंग जांभळा होतो. यात थोडे पाणी टाकले तरी हा जांभळा रंग टिकून राहतो. ही त्याची खूण आहे.

मेटॅलिन यलो हा अपायकारक रंग तुरडाळ, मुगडाळ किंवा चणाडाळीवरपण वापरला जातो. हे तपासण्यासाठी कोमट पाण्यात नमुन्याची डाळ टाका. हे पाणी वेगळे काढून त्यात वरील आम्लाचे २-३ थेंब टाका. गुलाबी रंग आल्यास मेटॅलिन पावडर आहे असे समजावे.

हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्यांवर मॅलाचाईट ग्रीन हा घातक रंग टाकला जातो. यासाठी एक पांढरा टिपकागद घेऊन त्यावर थोडे पाणी टाकून ओला करा आणि भाजीचा नमुना त्यावर ठेवा. हिरवा रंग कागदावर उतरल्यास भेसळ आहे असे समजा.

शुध्द तूप किंवा लोण्यात वनस्पती तूप भेसळ केले जाते. हे तपासण्यासाठी तूप किंवा लोण्याचा एक मोठा चमचाभर नमुना घेऊन तो गरम करा. एका छोटया वाटीत हा नमुना घेऊन त्यावर तेवढेच हायड्रोक्लोरिक आम्ल ओता आणि त्यातच एक चिमूटभर साखर टाका. हे मिश्रण थोडे हलवा आणि 5 मिनिटे स्थिर ठेवा. या मिश्रणात खालच्या बाजूला नारिंगी थर दिसल्यास वनस्पती तूपाची भेसळ आहे असे समजा.

काळया मि-यांमध्ये पपईच्या वाळलेल्या बिया मिसळल्या जातात. यासाठी हा नमुना मद्यार्कात टाका. काळी मिरी असतील तर ती खाली बसतात. मात्र पपईच्या बिया तरंगतात.

हिंगामध्ये पिवळया दगडाची पूड मिसळली जाते. हे तपासण्यासाठी पेलाभर पाण्यात हिंगपावडरीचा नमुना टाका. हिंग असेल तर तरंगतो. आणि दगडाची पूड असल्यास ती खाली बसते. (सूचना : शुध्द हिंग पाण्यात विरघळतो व पाण्याचा रंग पांढरा होतो. हिंग बनावट असेल तर असे होणार नाही)

केशरामध्ये मक्याचे केस वाळवून मिसळले जातात. हे केस ओढले तर लगेच तुटतात. मात्र केशर सहज तुटत नाही कारण ते चिवट असते. तसेच हा नमुना पाण्यात टाकल्यास केशरातून रंग पाझरतो तर मक्याचे केस तसेच राहतात.

अन्नभेसळ – बातम्यांमध्ये

हल्ली बातम्यांमध्ये अन्नभेसळीची बरीच उदाहरणे दिसून येतात. यापैकी काही उदाहरणे खाली दिली आहेत.

2008 साली गाझियाबादमध्ये 2500किलो खवा एका ट्रॅक्टर ट्रॉलीतून जप्त केला. हा खवा उत्तर प्रदेशातून दिल्लीकडे चालला होता. हा सर्व खवा भेसळयुक्त होता. यापूर्वीच असा 50 टन भेसळीचा खवा याच भागात सापडला होता. हा सर्व खवा मिठाई करण्यासाठी वापरला जातो.

अहमदाबादमध्ये शीतपेये पिऊन एक बालक दगावले आणि इतर दहाजण खूप आजारी पडले. या शीतपेयात बहुधा कीटकनाशके असावीत.

जून 2009मध्ये आग्रा शहरात पोलिसांना एक नकली तूपाचा कारखाना सापडला. प्राण्यांच्या चरबीपासून हे तूप बनवले जात होते. पण कुणीच सापडले नाही कारण कामगारांना आधीच धाडीची बातमी लागली होती. जुलै 2009 मध्ये हरियाना पोलिसांना भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे साठे सापडले. यात चीज, तूप आणि लोणी हे पदार्थ होते आणि सर्वात रासायनिक पदार्थ मिसळलेले तपासल्यावर यात पांढरा रंग, धुण्याचा सोडा, हायड्रोजन वगैरे पदार्थ सापडले. या पदार्थांचा वेगळा साठाही सापडला.

शीतपेयांमध्ये घातक कीटकनाशके सापडल्यानंतर बराच गहजब झाला. यामुळे लोकांनी या कंपनीची शीतपेये पिणे मोठया प्रमाणावर कमी केले.

मध्य प्रदेशातील पाच व्यापार्‍यांना तुपात भेसळ केल्याबद्दल अटक झाली. हा धंदा ग्वाल्हेर परिसरात मोठ्या प्रमाणावर पसरलेला होता. महाराष्ट्रात फलटण परिसरात रासायनिक पदार्थांपासून तयार केलेले द्रावण दुधात मिसळण्याचे एक कारस्थानच उघडकीला आले. दुधाच्या धंद्यात भेसळीची अनेक उदाहरणे सापडतात. टीपकागद, युरीया, इतर रसायने, पाणी वगैरे अनेक पदार्थ गवळी स्वत: किंवा दुधाचे व्यापारी मिसळतात असा संशय आहे.

२०१५ मध्ये मॅगी नुडल्स मध्ये शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेटचे प्रमाण जास्त असल्यामुळे अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाने (FSSAI) काही काळापुरती बंदी घातली.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.