respiratory icon श्वसनसंस्थेचे काही गंभीर आजार श्वसनसंस्थेचे नेहमीचे आजार
जंतखोकला

श्वासनलिकादाहाबरोबर जंतखोकल्याचा उल्लेख आलेला आहे. पण हा एक महत्त्वाचा आजार असल्याने याची थोडी तपशीलवार माहिती इथे दिली आहे.

कारणे

अनेक प्रकारच्या जंतांच्या जीवनचक्रात सूक्ष्म अळयांच्या अवस्थेत हे जीव रक्तामार्फत फुप्फुसात येतात. गोलजंत, आकडीजंत, हत्तीरोगाचे जंत, इत्यादी प्रकारच्या जंतांच्या सूक्ष्म अवस्थेत फुप्फुसांना वावडयाची सूज येते. यात दम लागणे, बारीक ताप राहणे, कोरडा खोकला येत राहणे, इत्यादी त्रास होतो.

सर्वसाधारणपणे डॉक्टर खोकल्याच्या रुग्णांना जंतुविरोधी औषध (उदा. कोझाल) व एखादी खोकल्याची बाटली देतात. पण या जंतुविरोधी औषधांनी जंतखोकला थांबत नाही. कारण कोझाल, इत्यादी औषधांचा जंतांवर काहीही परिणाम होत नाही. मुलांना होणा-या खोकल्याचे जंतखोकला हे एक कारण असू शकते.

उपचार

बेंडेझोल गोळया देऊन पहा. याने खोकला 7 दिवसांत न थांबल्यास तज्ज्ञाकडे पाठवा.

फुप्फुसाचा कर्करोग

smoking फुप्फुसाचा कर्करोग हा उतार वयातला एक गंभीर आजार आहे. विशेषतः धूम्रपान करणा-या व्यक्तींना हा आजार होण्याची 30 पटीने जास्त शक्यता असते. प्रदूषणामुळे याचे प्रमाण वाढत आहे. ऍस्बेस्टॉस धुळीमध्ये राहणा-यांना या आजाराचा विशेष धोका आहे. यामुळे अनेक देशांमध्ये ऍसबेसटॉसच्या वापराला बंदी घातली आहे. इतर अनेक कर्करोगांच्या रक्त प्रसारानंतर फुप्फुसामध्ये गाठी होतात. या अवस्थेत हा असाध्य आजार असतो.

खोकला येत राहणे, बेडक्यात रक्त पडणे ही यातली मुख्य लक्षणे आहेत. भूक मंदावणे, वजन घटणे, छातीत दुखणे, गिळायला त्रास, इत्यादी लक्षणेही दिसतात.

या रोगाचे निदान छातीच्या चित्रानेच होऊ शकते. यासाठी आता प्रगत तंत्रे (उदा. सी.टी. स्कॅन) उपलब्ध आहेत. प्राथमिक अवस्थेत शस्त्रक्रिया करून उपाय करता येतो. पण रोग जास्त पसरला असेल तर काही महिन्यांत मृत्यू संभवतो.

या आजारावर मुख्य प्रतिबंधक उपाय ‘धूम्रपान न करणे’ हाच आहे.

छातीत दुखणे (तक्ता (Table) पहा)

छातीत पाणी, पू होणे

न्यूमोनिया किंवा क्षयरोग यात फुप्फुसांचा जंतुदोष होतो. हा जंतुदोष फुप्फुसांच्या दुपदरी आवरणापर्यंत पोचला तर या आवरणासही जंतुदोष होतो. निरोगी अवस्थेत या दुपदरी आवरणात थोडा द्रव असतो. फुप्फुसाच्या हालचालीस असे आवश्यक असते. जंतुदोषामुळे यात पाणी, पू होतो. यामुळे त्या भागातल्या फुप्फुसाची हालचाल कमी होते व श्वसनाला अडथळा येतो. क्ष किरण चित्राने याचे चांगले निदान होऊ शकते.

लक्षणे-तपासणी

छातीच्या संबंधित भागात दुखते व दम लागतो. जंतुदोषामुळे ताप आणि थकवा जाणवतो. या भागात बोटाने ठोकल्यावर ‘ठक्क’ असा (घट्ट) आवाज येतो. आवाजनळीने तपासल्यावर श्वसनाचे आवाज त्या भागात अजिबात ऐकू येत नाहीत.

उपचार

या रोगावर तज्ज्ञ डॉक्टरच उपचार करू शकतात. पाणी खूप असेल तर दम लागतो. अशा वेळी सुई टोचून पाणी काढून टाकणे आवश्यक आहे.

पू असेल तर छातीतून पू काढून टाकण्यासाठी छोटी नळी बसवावी लागते. यासाठी छोटी शस्त्रक्रिया करावी लागते.

जंतुदोष आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती जंतुविरोधी औषधे देण्यात येतात. जोपर्यंत जंतुदोष आटोक्यात येत नाही तोपर्यंत पाणी, पू जमतच राहील. बहुधा अशा आजाराचे क्षयरोग हेच कारण असते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.