respiratory icon श्वसनसंस्थेचे नेहमीचे आजार श्वसनसंस्थेचे काही गंभीर आजार
सर्दी- पडसे

cold सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो.

सर्दी-पडसे एका जातीच्या विषाणूंमुळे (किंवा काही वेळा वावडयामुळे) होते. हे विषाणू एकापासून श्वासावाटे दुस-याकडे सहज पसरतात. एक-दोन दिवसांत त्यालाही सर्दी सुरू होऊ शकते. या विषाणूंविरूध्द थोडीफार प्रतिकारशक्ती तयार झाली तरी ती अल्पजीवी असते म्हणून, त्याच व्यक्तीला पुन्हापुन्हा सर्दी होऊ शकते.

रोगनिदान
  • सर्दी-पडशामध्ये नाकाच्या आतल्या आवरणाचा दाह होतो, त्याला सूज येते व त्यातून पाणी वाहते. नाकाचा आतला भाग अशा वेळी लाल व सुजलेला दिसेल. सुजेमुळे कधीकधी नाकाच्या आतली हवेची वाट अरूंद होऊन श्वासाला त्रास होतो (नाक चोंदणे).
  • सर्दी-पडशात नाकाच्या आतल्या भागाला सूज आल्याने नाकातून कानांत पोचणा-या ‘कानाघ’ नळीचेही तोंड कधीकधी बंद होते. त्यामुळे कानात विचित्र संवेदना होणे, कान गच्च होणे, दडे बसणे, इत्यादी त्रास होतो.
  • सर्दीच्या पहिल्या दोन तीन दिवसांत नाकातले पाणी पांढरे आणि पातळ असते. नंतर हळूहळू ते घट्ट होत जाते. कधीकधी नंतर होणारा जंतुदोष (जिवाणू) हे या घट्टपणाचे कारण असते. सर्दी-पडशात बारीक ताप येतो.
  • डोके जड होते व दुखते.
  • डोळयातून सारखे पाणी येते.
  • वावडयाच्या सर्दीमध्ये खूप शिंका येतात. नाकातून पाणी गळते. नाक व डोळे यांना खाज येते.

सर्वसाधारणपणे सर्दी एका आठवडयात पूर्णपणे बरी होते.

उपचार

डोकेदुखीवर ऍस्पिरिन किंवा पॅमाल घेण्यापलीकडे विशेष उपचाराची गरज पडत नाही.

सीपीएम गोळीने वावडयाची सर्दी कमी व्हायला मदत होते. मात्र या गोळीमुळे गुंगी व झोप येते. पण शरीराला थोडा व्यायाम दिला तरीही नाक आपोआप मोकळे होते.

अजून विषाणूंवर कोणतेही परिणामकारक औषध नसल्याने विषाणूसर्दी ‘बरी’ होण्यासाठी कसलेही औषध नाही. जाहिरातीत अनेक प्रकारच्या गोळया असल्या तरी सर्दी बरी करणारे औषध त्यात नसते. त्यात फक्त डोकेदुखीसाठी ऍस्पिरिन मात्र असते. ‘विक्स’, ‘रबेक्स’ या मलमांमध्ये असलेल्या पाच घटकांपैकी फक्त एक घटक मेंथॉल उपयोगी ठरू शकतो. तोही फक्त चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी. बाकी सर्व निरुपयोगी मालमसाला! कसलेही औषध घेतले तरी सर्दी बरी व्हायला आठवडाभर लागू शकतो.

सर्दीचा त्रास वारंवार होत असल्यास कानाघ तज्ज्ञाकडून अंतर्गत तपासणी करून घ्यावी. नाकाच्या अंतर्भागात ‘पॉलिप’ (लहान द्राक्षघडासारखी वाढ) असल्यास वांरंवार सर्दीचा त्रास होतो. हा विकार सूक्ष्म दर्शकातून शस्त्रक्रियेने (एंडोस्कोपी सर्जरी) पूर्ण बरा करता येतो.

आयुर्वेद

सर्दी- पडसे कमी होण्यासाठी लंघन (उपवास) खूपच उपयुक्त आहे. पंखा, धुरळा किंवा इतर काही विशिष्ट कारण माहीत असल्यास ते टाळण्याचा प्रयत्न करावा. काही लोकांना रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी पिण्याची सवय असते, यामुळेही सर्दी-पडसे होऊ शकते. थंडी, पावसाळा संपून ऊन तापू लागताना ब-याचजणांना सर्दी होते. ही सर्दी थांबवण्याचा प्रयत्न करू नये; वाहू द्यावी, म्हणजे श्वसनसंस्थेचे इतर भाग (श्वासनळी, फुप्फुसे) निरोगी राहतात. अशी सर्दी औषधांनी दाबण्याचा प्रयत्न केल्यास श्वसनसंस्थेच्या खालच्या भागात स्राव सुरू होतात असा आयुर्वेदाचा अनुभव आहे. म्हणूनच नाकातून सर्दी वाहून जाऊ देणे महत्त्वाचे आहे.

सर्दीवर नागगुटी किंवा त्रिभुवनकिर्ती या औषधांच्या 2-2 गोळया दिवसातून 3 वेळा याप्रमाणे 3 दिवस द्या.

मसालेदार व तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे श्वसनसंस्थेत पाझर वाढून नाक लवकर मोकळे होते असा अनुभव आहे. या गुणांचा उपयोग करून तिखटाने सर्दीवर थोडा आराम मिळू शकतो.

होमिओपथी निवड

नायट्रिक ऍसिड, ब्रायोनिया, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया, ऍलियम सेपा, पेन्थोरम

होमिओपथी निवड (नाक चोंदणे)

आर्सेनिकम, बेलाडोना, ब्रायोनिया, हेपार सल्फ, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला, -हस टॉक्स, सिलिशिया, सल्फर, थूजा

जलनेति

सतत व वारंवार सर्दीसाठी हा उपाय करुन पाहावा. नाकातून स्राव वाहून जाण्यास मदत व्हावी म्हणून कोमट मीठपाण्याने नाकाच्या अंतर्भागाची स्वच्छता करावी. या क्रियेला जलनेति म्हणतात. यासाठी मीठ मिसळून अश्रूंच्या चवीचे सुमारे अर्धा लिटर कोमट खारट पाणी तयार करावे. हे पाणी आधी ‘चालू’ असलेल्या नाकपुडीतून हळूहळू सोडावे. तोंडाने श्वासोच्छ्वास चालू ठेवावा म्हणजे हे पाणी घशात उतरत नाही. ते आपोआप दुस-या नाकपुडीतून वाहते. यानंतर हाच प्रयोग दुस-या नाकपुडीतून करावा. नाकाचा अंतर्भाग, पोकळया, सायनस पोकळयांची तोंडे या क्रियेने स्वच्छ व मोकळी होतात. यामुळे घाण बाहेर पडायला मदत होते.

मिठाचे प्रमाण अश्रूंच्या चवीपेक्षा कमी किंवा जास्त झाले असेल तर या पाण्याने नाक चरचरते.

शुध्दीक्रिया झाल्यानंतर एकेक नाकपुडी हलकेच शिंकरून साफ करावी. वाकून उभे राहिल्यावर घशात न जाता पाणी सहज बाहेर पडते.

नस्य

यानंतर पाठीखाली दोन उशा घेऊन उताणे झोपावे. (डोक्याखाली नाही) या अवस्थेत नाकात गाईच्या किंवा म्हशीच्या पातळ तुपाचे एक-दोन थेंब टाकावेत. मानेच्या अशा अवस्थेत नाकात टाकलेले थेंब घशात उतरत नाहीत. यासाठी वचादि तेल किंवा खोबरेल तेलही चालते. अणुतैल औषधांचे थेंब नाकात टाकण्याने वारंवार होणारा सर्दीचा त्रास आटोक्यात राहतो. वेखंडयुक्त तेलाचे थेंबही यासाठी चांगले. वैद्यकीय दुकानात ते ‘वचादि तेल’ या नावाने मिळते.

सर्दीपासून नंतर होणारे आजार

सर्दी – पडशाने नंतर आणखीही काही आजार निघू शकतात. ते म्हणजे कानदुखी, सायनसदुखी, घसासूज, श्वासनलिकादाह, इत्यादी. सर्दी-पडशात विषाणुमूळे दाह असल्याने श्वसनमार्गाची प्रतिकारशक्ती थोडी कमी होते. त्यामुळे जंतुदोष होऊ शकतो.

कानाघ नळीतून सर्दी-पडशाचे पाणी कधीकधी कानात ढकलले जाते. यामुळे मध्यकर्णाला सूज येते. यामुळे कान ठणकतो व नंतर कानाचा पडदा फुटू शकतो.

सर्दीमुळे घसासूज व श्वासनलिका दाह झाला असेल तर खोकला हे प्रमुख लक्षण असते.

सायनसदुखीमध्ये कपाळात भुवयांवर, डोळयांच्या खाली जडपणा किंवा ठणका सुरू होतो.

या सर्व इतर त्रासांचे कारण बहुधा जंतुदोष असतो. या तीनही आजारांत कोझाल, ऍमॉक्सी किंवा टेट्राच्या गोळयांनी आराम पडतो. सायनसदुखी मात्र कधीकधी टिकून राहते. सायनसमधला पू काढून टाकण्यासाठी कधीकधी शुध्दीक्रिया करावी लागते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.