Ayurveda Icon होमिओपथी कसे काम करते औषध विज्ञान व आयुर्वेद
होमिओपथी कसे काम करते

Homeopathy Tablets अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक रोगांवर किंवा प्रकृती बिघडली तर ‘होमिओपथी’ च्या शास्त्राप्रमाणे उपचार करता येतात. या शास्त्रामध्ये औषधांचा विचार अगदी वेगळया प्रकारे केला गेला आहे.

हानेमान नावाच्या एका विद्वान डॉक्टरने सुमारे दोनशे वर्षापूर्वी या उपचारपध्दतीचा शोध लावला. त्याकाळी तापाकरता, विशेषत: हिवतापाकरता, क्विनाईन हे एक औषध खूप वापरले जाई. हे औषध विषारी असल्याने त्याचे दुष्परिणामही प्रचंड प्रमाणात दिसून येत असत. या उपचारपध्दतीमागील विचार हानेमान यांना फार ठोकळेबाज व ढोबळ वाटला. रुग्ण वेगवेगळी लक्षणे सांगत असताना क्विनाईन आणि इतर पारा, गंधक, इत्यादी तीन-चार औषधांवर काम भागवणे योग्य नाही, असेही त्यांना वाटले. त्यांनी निरोगी अवस्थेत स्वत: क्विनाईनचे डोस घेऊन त्याचा काय परिणाम होतो ते पाहण्याचे ठरविले. या प्रयोगामुळे झाले असे, की त्यांच्या स्वत:च्या शरीरामध्ये काही लक्षणे उद्भवली. ती लक्षणे त्यांनी नोंदवून ठेवली. त्यांचा अभ्यास करताना त्यांची अशी खात्री पटली, की ‘मलेरिया’ (हिवताप) झालेला रुग्ण जी लक्षणे सांगतो त्याच्याशी ही लक्षणे अतिशय मिळती-जुळती आहेत. ही घटना अनेक वेळा तपासून पाहिली. त्यांनी स्वत: हे औषध अनेक वेळा वेगवेगळया मात्रेत घेतले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले, की मात्रा बदलल्याने लक्षणांच्या प्रकारात फारसा फरक पडत नाही. त्या वेळी त्यांच्या असेही लक्षात आले, की कितीही कमी, सूक्ष्मतिसूक्ष्म मात्रा घेतली तरी निरोगी माणसाच्या शरीरामध्ये ठरावीक लक्षणे निर्माण करण्यास ती पुरेशी असते.

औषधांची शक्ती

हानेमान यांची अनेक शास्त्रांमध्ये उत्तम गती असल्याने तसेच रसायनशास्त्राची चांगली माहिती असल्याने त्यांनी सर्व प्रयोग अत्यंत काटेकोरपणे केले. त्यांचे परिणाम ते नोंदवीत गेले. औषधे सूक्ष्म करण्याकरता त्यांनी शतांश पध्दत वापरली. म्हणजे प्रथम औषध विशिष्ट प्रकाराने तयार केले. नंतर त्या औषधाचा एक भाग आणि वाहकाचे नव्याण्णव भाग (म्हणजे पाणी, किंवा मद्यार्क), दुग्धशर्करा यांसारखे अप्रकियाशील पदार्थ घेतले. त्यानंतर त्यांच्यावर निश्चित क्रमाने धक्के देणे (द्रवांसाठी ) किंवा घनरूपपदार्थासाठी एकाच दिशेने खलणे अशा पध्दतीने ‘एक्र’ शक्तीचे औषध निर्माण केले.

‘दोन’ शक्तीचे औषध करताना त्यांनी वरील एक शक्तीच्या औषधाचा एक भाग घेतला व त्यात आणखी नव्व्याण्णव भाग वाहक घातले. पुन्हा धक्के देणे अथवा खलणे आवश्यक आहेच. याचा अर्थ असा, की होमिओपथीच्या ‘दोन’ शक्तीच्या औषधाच्या एक घन से. मी. मध्ये 1/10,000 घन सें. मी इतके भाग औषध असते. हाच आकडा आपण 1×100-2 असा लिहू शकतो.

होमिओपथीच्या उपचारामध्ये सामान्यत: 30 किंवा अधिक शक्तीचे औषध वापरले जाते. म्हणजेच हा आकडा आपण 1/10030 किंवा 1×100-30 असा लिहू शकतो. होमिओ औषधांच्या नावापुढे घातांकांचा आकडा लिहिलेला असतो. यालाच कोणी औषधाची शक्ती किंवा ‘पोटेन्सी’ म्हणतात. पण त्याला शक्ती म्हणणे घोटाळयांचे आहे. कारण तो औषधाच्या सूक्ष्मतेचा आकडा आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.