Anatomy Icon शरीरशास्त्र
ज्ञानेंद्रिय

Eye Diagram आपला डोळा, कान, जीभ, त्वचा, नाक यांद्वारे (पाच ज्ञानेंद्रिये) आपल्याला जगाचे ज्ञान होत असते. या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये खास प्रकारच्या पेशींचे जाळे असते. बाहेरील परिस्थितीमुळे या पेशीत वेगवेगळे संदेश निर्माण होतात. असे संदेश चेतातंतूमार्फत मेंदूतील योग्य केंद्राकडे पोहोचवले जातात उदा. डोळयाच्या बुबुळातून प्रकाश आत गेला, की बाहेरच्या वस्तूंचे चित्र आतल्या पडद्यावर उमटते. या पडद्यात अत्यंत संवेदनाक्षम पेशींचे जाळे असते. प्रकाशाचा कमीअधिकपणा , वस्तूंच्या चित्रातील रंग, आकार वगैरे गोष्टींची माहिती या पेशींतून चेतातंतूमार्फत मेंदूपर्यंत पोहोचते. तसेच कानातल्या पेशींवर आवाजाच्या लाटा व कंपने आदळली की त्यासंबंधी माहिती मेंदूकडे जाऊन ऐकू येते. जिभेत चव ओळखणारे पेशीगट असतात. तसेच त्वचेवर स्पर्श, तापमान, दाब वगैरे ओळखणा-या पेशी असतात.

ज्ञानेंद्रियात बिघाड होणे, चेतातंतूंमार्फत मेंदूंशी संबंधित भागात बिघाड होणे यापैकी काहीही झाले तर त्या ज्ञानेंद्रियाच्या कामात अडथळा येतो.

गर्भाचे लिंग (मुलगा की मुलगी?) कसे ठरते?

Fetal Sex Diagram लिंगनिश्चिती म्हणजे ‘मुलगा होणार की मुलगी’ हे कसे होते ते पाहू या. पुरुषाच्या शरीरातील सर्व पेशींत X Y ही लिंगसूत्रे (आणि 44 शरीरसूत्रे) असतात, तर स्त्रीशरीरात लिंगसूत्रे फक्त XX प्रकारची असतात. शरीरसूत्रांची संख्या दोन्हीकडे समान आहे.

पुरुषाचे शुक्रबीज व स्त्रीचे स्त्रीबीज यात निम्मी म्हणजे प्रत्येकी 23 रंगसूत्रे असतात. या 23 पैकी एक रंगसूत्र ‘लिंगसूत्र’ म्हणून ओळखले जाते; बाकीची 22 रंगसूत्रे ही ‘शरीरसूत्रे’ असतात. लिंगसूत्रे दोन प्रकारची असतात, म्हणून त्यांना X आणि Y अशी नावे आहेत. पुरुषात शुक्रबीज तयार होताना पेशीविभाजनामुळे 22 + X आणि 22 +Y अशी दोन प्रकारची शुक्रबीजे तयार होतात. मात्र स्त्रीमध्ये तयार होणा-या लिंगपेशी एकाच म्हणजे 22 + X प्रकारच्या असतात.

स्त्रीबीजाचे फलन होते म्हणजे त्याला शुक्रबीज येऊन मिळते. स्त्रीबीजास पुरुषाकडून 22 X प्रकारचे शुक्रबीज मिळाल्यास होणारा गर्भ 44 XX (म्हणजे मुलगी) होईल.

याउलट पुरुषाकडून 22 Y प्रकारचे शुक्रबीज मिळाल्यास होणारा गर्भ 44 X Y (म्हणजे मुलगा) होईल. म्हणजे मुलगा होणार की मुलगी, हे एका अर्थाने पुरुषाकडून ठरते.

खरेतर वीर्यामध्ये असलेल्या लक्षावधी शुक्रपेशींमध्ये 22 X व 22 Y या दोन्ही प्रकारच्या पेशी असतात. शुक्रबीजांपैकी स्त्रीबीजास X मिळेल की Y ही गोष्ट योगायोगावर आणि काही अज्ञात परिस्थितीवर ठरते. परंतु मुलीच झाल्या तर स्त्रीला कुटुंबात,समाजात त्रास भोगावा लागतो. अनेक वेळा मारहाण, सोडून देणे, इत्यादी प्रकारांना तोंड द्यावे लागते. लिंगनिश्चितीची शास्त्रीय बाजू सर्वांना नीट कळायला पाहिजे. या माहितीमुळे काही प्रमाणात तरी हा अन्याय दूर व्हायला मदत होईल. पण केवळ जीवशास्त्रीय कारणांपलीकडे जाऊन मानवतेच्या पातळीवरच अशा सामाजिक दोषांचा मुकाबला करावा लागेल.

गर्भधारणा व गर्भाची वाढ

पुरुषाकडून आणि स्त्रीकडून प्रत्येकी एक सूक्ष्म बीज (पेशी) एकत्र येऊन गर्भधारणा होते. पुरुषाकडून येणा-या पेशीला शुक्रबीज म्हणतात आणि स्त्रीकडून येणा-या पेशीला स्त्रीबीज. स्त्री-पुरुषसंबंधाच्या वेळेस इतर परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा या दोन पेशी एकत्र येऊन गर्भधारणा होते.

ही गर्भधारणा स्त्रीच्या ओटीपोटातल्या गर्भाशयात होऊन या दोन पेशी प्रथम एकजीव होतात. नंतर त्यापासून सतत विभाजनाने अनेक पेशींची निर्मिती होते. हळूहळू पेशींची संख्या वाढेल तशी त्यांची तीन पदरांमध्ये रचना होते. त्या प्रत्येक पदराची वेगळी वाढ होऊन निरनिराळे अवयव व संस्था तयार होतात. या सर्व घटनाक्रमाला साधारणपणे 280 दिवस लागतात.

माणूस कसा निर्माण झाला

Gradual Development आपल्या पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होऊन कोटयवधी वर्षे झाली. आधी केवळ एकपेशीय जीव होते. मग वनस्पती व प्राणी अशा दोन मुख्य शाखा झाल्या. प्राण्यांमध्ये आधी छोटे गोगलगायीसारखे जीव, कीटक, कृमी, नंतर पाठीचा कणा असलेले मासे, नंतर पक्षी, त्यानंतर सस्तन प्राणी आणि माणूस असा हा प्रवास आहे. पृथ्वीवरच्या अनेक खंडांत ही प्रक्रिया चालू होती व आहे. त्यामुळे प्राण्यांच्या प्रजाति आणि माणसांचे निरनिराळे वंश दिसतात. या उत्क्रांतीच्या प्रवासात अनेक छोटेमोठे प्राणी- वनस्पती समूळ नष्ट झाल्या तर अनेक नवीन प्रकार तयार झाले. बदलत्या परिस्थितीप्रमाणे (अन्न, हवामान, परिसर) वनस्पती व प्राणीजीवनात हे बदल होत जातात. ग्लोबल वॉर्मिंग उर्फ पृथ्वीची तपमानवाढ होण्यामुळे जीवसृष्टीत अनेक बदल संभवतात.

मनुष्यजात पृथ्वीवर जन्मली तिथे हवामान, जीवजंतू, वनस्पती, अन्न, इत्यादी सर्व शत्रू-मित्र पहिल्यापासूनच आहेत. त्यांतल्या काहींशी माणसाला लढायला लागते तर काही त्याला जगवतात. या लढाया मनुष्य हरायला लागला, की त्याला आजार, साथी असे स्वरुप येते आणि परिस्थिती अनुकूल असेल तर भरभराट होते. या सगळया प्रदीर्घ उत्क्रांती प्रवासात महत्त्वाचा धागा आहे तो रंगसूत्रे आणि गुणसूत्रांचा.

आता उपलब्ध माहितीनुसार मानवजातीचा जन्म आफ्रिका खंडात झाला आहे. याला आता कोटयवधी वर्षे लोटली. काळाप्रमाणे मानववंशात बदल होत गेले. मानववंश इजिप्तमधल्या नाईल नदीच्या खो-यापर्यंत जायला लक्षावधी वर्षे लागली. तिथून पुढे मानवी टोळया युरोप-आशिया-अमेरिका-ऑस्ट्रेलिया खंडात गेल्या. या प्रदीर्घ प्रवासात माणसाचे विविध वंश तंत्रज्ञान, भाषा, संस्कृती, पिके, आजार वगैरे जडण घडण होत गेली. आता या सर्वच प्रक्रियांनी वेग घेतला आहे.

हृदय व रक्ताभिसरण संस्था

Cardiovascular System Diagram आपले शरीर अब्जावधी लहान-मोठया पेशींनी बनलेले आहे. या पेशींना काम करण्यासाठी निरनिराळे पदार्थ लागतात. उदा. साखर, पाणी, प्रथिन-घटक, प्राणवायू, जीवनसत्त्वे वगैरे. हे पदार्थ प्रत्येक पेशीपर्यंत पोचवून तिथले टाकाऊ पदार्थ गोळा करुन आणणे हे एक मोठे काम आहे. हे काम रक्ताभिसरण संस्था करते. रक्ताभिसरण म्हणजे शरीरात सर्वत्र रक्ताचे सतत चलनवलन करणे.

रक्ताभिसरणातील प्रमुख काम हृदय करते. आपले हृदय दर मिनिटाला सुमारे 60 ते 80 वेळा आकुंचन-प्रसरण पावून रक्त ढकलते. प्रत्येक आकुंचनाने रक्त ढकलले जाते आणि ते नाडीवर बोट ठेवल्यास कळू शकते. माणूस धावत आला असेल, घाबरला असेल तर ही क्रिया जोरात होते. यामुळे छातीत धडधड जाणवू शकते. हृदय दोन-तीन मिनिटे जरी बंद पडले तरी मृत्यू ओढवतो.

हे रक्तवाहिन्यांचे जाळे (एखाद्या झाडाच्या फांद्यांप्रमाणे) सर्वत्र पसरलेले असते. शेवटी शेवटी अत्यंत सूक्ष्म केशवाहिन्यांतून हे रक्त पेशीसमूहांना पोचवले जाते. पेशींजवळ गेल्यावर पेशी रक्तातील आवश्यक घटक (प्राणवायू, साखर, प्रथिन घटक, क्षार) घेतात. तसेच पेशींमधले टाकाऊ पदार्थ (कार्बवायू) वगैरे) या केशवाहिन्यांत जातात.

अशा रीतीने पेशीपर्यंत शुध्द रक्त जाऊन तेथे ते अशुध्द होते. हे रक्त परत वेगळया रक्तवाहिन्यांमार्फत (नीला) हृदयाच्या वरच्या उजव्या कप्प्यात आणले जाते. तिथून ते खालच्या उजव्या कप्प्यात जाते. तिथून पुढे ते फुप्फुसाच्या जाळयात ढकलले जाते. फुप्फुसाच्या जाळयात श्वासावाटे आलेला प्राणवायू रक्तात शिरतो. तसेच रक्तातला काही अतिरिक्त कार्बवायू श्वासावाटे बाहेर पडतो. हे शुध्द झालेले रक्त नीलांमार्फत परत वरच्या डाव्या कप्प्यात आणले जाते. असे एक चक्र पूर्ण होते. अशी क्रिया सेकंदासेकंदाला आयुष्यभर सतत चालू राहते.

खालच्या डाव्या कप्प्यातून सर्व शरीरात रक्त पोचवायचे असल्याने त्या कप्प्यात आकुंचनाचा जोर व दाब सर्वात जास्त असतो. या दाबामुळे अगदी बारीक जाळयांपर्यत रक्त ढकलले जाते. एखाद्या शुध्दरक्तवाहिनीला जखम होते तेव्हा रक्ताच्या चिळकांडया या दाबामुळेच उडतात. मात्र नीला कापली गेली तर रक्त हळूहळू वाहते; त्यातून चिळकांडया उडत नाहीत.

पेशी, पेशीगट आणि पेशीसंस्था

Cells Muscular आपले घर हे अनेक दगडविटांचे मिळून बनलेले असते. तसेच आपले शरीरही असंख्य सूक्ष्म पेशींचे बनले आहे.

सूक्ष्म जीवजंतूंपैकी बरेच प्रकार केवळ एका पेशीचेच बनलेले असतात. या पेशी स्वयंपूर्ण असतात. सभोवतालच्या परिस्थितीतून अन्न घेणे, स्वसंरक्षण करणे, पुनरुत्पादन करणे, नको असलेले पदार्थ बाहेर टाकणे ही सर्व कामे ती एकच पेशी करते.

मात्र प्राणी जेवढा प्रगत, तसा या पेशींच्या कामांमध्ये वेग वेगळेपणा असतो. उदाहरणार्थ, एखाद्या छोटया कारखान्यात एकच माणूस माल आणणे, प्रक्रिया करणे, तो विकणे, साफसफाई ठेवणे, हिशेब ठेवणे अशी सर्व कामे करत असतो. मोठया कारखान्यात मात्र या प्रत्येक कामासाठी इंजिनीयर, कामगार, कारकून, ड्रायव्हर, मॅनेजर अशी खास माणसे नेमलेली असतात. या प्रत्येकाचे काम जसे वेगळे तसेच माणसात प्रत्येक पेशीसमूहाचे काम वेगळे असते.

यासाठी पेशींचे अनेक प्रकार दिसून येतात. त्वचेच्या पेशी चपटया, पसरट असतात. जठराच्या अंतर्भागातील आवरणाच्या पेशी उभट दंडाकृती असतात. हाडांच्या पेशी वेगळया असतात तर मेंदूच्या पेशींना अनेक लांब टोके असतात. रक्ताच्या पेशी निरनिराळया प्रकारच्या असतात आणि त्यांची कामेही वेगवेगळी असतात. वीर्यातल्या प्रत्येक शुक्रपेशीला हालचालीसाठी शेपटी असते. स्त्रीजननसंस्थेत ठरावीक प्रवास करुन स्त्रीबीजाचे फलन करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. पेशींच्या या विविध गुणधर्मामुळे शरीरात असंख्य प्रकारची कामे पार पाडली जातात. प्रत्येक प्रकारच्या पेशींचा गुणसूत्र-संच सारखाच असतो. त्या त्या व्यक्तीत मात्र त्यातला काही भाग जागृत तर उरलेला सुप्त असतो.

अनेक पेशीसमूहांचा एखादा गट, वेगळे खास काम करीत असला तर त्या गटाला ‘संस्था’ असे म्हणता येईल. उदा. पचनसंस्था, श्वसनसंस्था, इत्यादी. पेशीसमूहांची कामे वेगवेगळी परंतु परस्परपूरक असतात.

ही सर्व रचना व उत्पत्ती निसर्गात सहज होत असली तरी गुंतागुंतीची आहे. साधी एक सजीव पेशी आपल्या हाताने निर्माण करणे हे आतापर्यंत माणसाला जमलेले नाही. ही सृष्टी निर्माण होताना पृथ्वीवरच्या हजारो चौरस मैलांच्या जमीन आणि अथांग पाण्यामध्ये कोटयवधी वर्षे निसर्गाकडून असंख्य प्रयोग झालेले आहेत.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.