Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण योजना

Microscope राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण योजना आता सर्वत्र लागू आहे. यातला मुख्य भाग म्हणजे उपकेंद्रातील नर्स किंवा पुरुष आरोग्य कर्मचा-यांनी दोन प्राथमिक कामगि-या करणे अपेक्षित आहे. (अ) खाकरा-बेडक्याचा नमुना घेणे. (ब) क्षयरोगासाठी औषध वाटप करणे. यामुळे क्षयाचा आजार झालेल्या व्यक्तींना जवळच नियमित उपचार मिळू शकतील. उपकेंद्राबरोबरच गावोगावच्या आशा कार्यकर्त्यांकडे व खाजगी दवाखान्यातही अशाच प्रकारची सेवा मिळू लागली आहे.

या नवीन योजनेत खाकरा-बेडका घेण्याची पध्दत, औषधयोजना आणि देखरेखीसाठी काही सुधारणा केल्या आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्य क्षयरोग केंद्र असते, त्या खाली तालुकावार क्षयरोग उपकेंद्रे व बेडका तपासण्याच्या सोयी आहेत. औषधयोजना सुटसुटीत झाली असून औषधे उपकेंद्रात समक्ष घ्यायची आहेत. काही त्रास झाला तर त्याबद्दल योग्यती मदत/मार्गदर्शन करण्यासाठी उपकेंद्रावर सोय आहे.

यातली औषधयोजना/गट ठरवण्याचे काम शासकीय आरोग्यकेंद्राचे डॉक्टर करतात. उपकेंद्रावर फक्त उपचार होतात. आवश्यक तर बेडक्याचा नमुना काचपट्टीवर घेतला जातो. सर्व गोळया प्लॅस्टिक पॅकमध्ये मिळतात. पहिले दोन महिने (गट व मध्ये तीन महिने) जास्त औषधे दिली जातात, त्यानंतर कमी, असे तत्त्व आहे. प्रत्येक रुग्णाचे पूर्ण खोके वेगळे ठेवले जाते. म्हणजे अपुरा औषधोपचार व्हायचे कारण नसते.

या योजनेत क्षयरोगाचे खालीलप्रकारे वर्गीकरण केलेले आहे.

प्रवर्ग 1 : बेडक्यात जंतू सापडलेले नवीन रुग्ण किंवा गंभीर/जास्त आजारी असलेले इतर क्षयरुग्ण. यांना दोन महिने HRZE आणि मग चार महिने HR ही औषधयोजना (लाल खोके) असते. यातली औषधे आठवडयातून (दिवसाआड) फक्त तीन दिवस घेतली जातात. पैकी पहिल्या दोन महिन्यांचे उपचार केंद्रावर आरोग्यकार्यकर्त्या समक्ष घ्यायचे आहेत.

प्रवर्ग 2 : एकदा उपचार झालेले पण आता परत आजारी झालेले रुग्ण या गटात येतात. यांना दोन महिने HRZES ही औषधे (निळे खोके) समक्ष व त्यानंतर पाच महिने HRE ही औषधयोजना ठरलेली आहे. सर्व उपचार आठवडयातून तीन दिवस (दिवसाआड) दिले जातात.

प्रवर्ग 3 : यात बेडक्याचे जंतू नसलेले क्षयाचे नवीन रुग्ण आणि इतर सर्व क्षयरुग्ण (जास्त आजारी नसलेले) येतात. यांना पहिले दोन महिने HRZ व त्यानंतर चार महिने HR ही औषधयोजना (हिरवे खोके) आहे. सर्व औषधे आठवडयातून तीन दिवस (म्हणजे दिवसाआड) याप्रमाणे घ्यायची असतात.

R (रिफामायसिन), H (आयसोनेक्स), Z (पायराझिनामाईड), E(इथांबुटाल), S(सेप्ट्रोमायसिन)
पाठपुरावा

ही सर्व उपाययोजना करण्याची मुख्य उद्दिष्टे म्हणजे

  • सर्वांनी नियमित व पूर्ण उपचार घ्यावेत.
  • संसर्गाला आळा बसावा आणि रुग्ण लवकर बरा व्हावा.
  • यासाठी दर दोन महिन्यांनी बेडक्याची पुनर्तपासणी केली जाते.

प्रवर्ग 1 : मधील रुग्णांच्या बेडक्यात जंतू सापडले तर दोन महिन्यांच्या उपचारामध्ये आणखी एक महिना वाढवला जातो.

प्रवर्ग 2 : मध्ये पहिली बेडका तपासणी तीन महिन्यांनी केली जाते. त्यात जंतू सापडले तर आणखी महिनाभर तीच उपाययोजना करून नंतर पुढची औषधयोजना केली जाते.

प्रवर्ग 3 : मधील रुग्णाची बेडका तपासणी दोन महिन्यांनी केली जाते, त्यात जंतू सापडले तर त्याला सरळ प्रवर्ग 2 प्रमाणे उपचार चालू केले जातात. जंतू नसतील तर ठरल्याप्रमाणे उपचार केले जातात.

औषधांचे काही त्रासदायक परिणामही होतात. अशा वेळी काय करायचे याची सूचना औषधे देणा-याला दिलेली असते. या सूचना व औषधांची माहिती सोबतच्या तक्त्यात आहे.

एड्सच्या प्रसाराबरोबर क्षयरोग होण्याची आणि वाढण्याची शक्यता मनात धरली पाहिजे. कमी प्रतिकारशक्तीमुळे एड्स रुग्णाला झालेला क्षयरोग लवकर बरा होत नाही. एड्सग्रस्त क्षयरोगाचे जंतू औषधांना दाद देईनासे होतात. असे घातक जंतू पसरण्याचा मोठा धोका आहे.

क्षयरोग:समक्ष उपचार पद्धतीचा गोषवारा (तक्ता (Table) पहा)

महाराष्ट्रातील क्षयरोग नियंत्रण योजना

महाराष्ट्रात समक्ष उपचार योजना सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचलेली आहे. याशिवाय सर्व आशा कार्यकर्त्यांना क्षयरोगाची शंका घेऊन रुग्ण पाठवणीसाठी प्रशिक्षण दिलेले आहे. एका रुग्णाचे समक्ष उपचार पूर्ण करण्यासाठी आशा कार्यकर्त्यांना 500 रु. मानधन दिले जाते.

जन्मानंतर बी.सी.जी. प्रत्येक बाळाला टोचले जाते

महाराष्ट्रात सुमारे दीड लाख संभावित रुग्णांची मागील वर्षी तपासणी करण्यात आली. यापैकी सुमारे 20 हजार रुग्णाच्या बेडक्यामध्ये क्षयाचे जंतू सापडले म्हणजेच संशयित रुग्णांपैकी 13% रुग्णांच्या बेडक्यामध्ये जंतू आढळले. मागील वर्षी एकूण 36 हजार नवे रुग्ण समक्ष उपचाराखाली आणण्यात आले.

फुप्फुस – क्षयरुग्णांपैकी 66% नवे रुग्ण शोधले जातात. समक्ष उपचार योजनेतून सुमारे 87% रुग्ण मागील वर्षी बरे झालेले आहेत. मात्र न सापडलेले रुग्ण शोधून किमान 80% रुग्ण उपचाराखाली आणण्याची आवश्यकता असते.

दुसरी अडचण अशी की बरे न होणा-या रुग्णांची संख्या 33% इतकी जास्त असल्याने यांच्यामध्ये प्रतिकारकक्षम जंतूंची शक्यता असते. हे जंतू समक्ष उपचारातील औषधांना दाद देत नाहीत. अशा जंतूंचा प्रसार झाला तर हळूहळू सर्व कार्यक्रमालाच खीळ बसू शकते.

उद्दिष्टे

नवीन शोधलेल्या क्षयरुग्णांपैकी 85% रुग्ण बरे व्हावेत आणि दरवर्षी दर लाख लोकसंख्येत निदान 56 नवे रुग्ण (जंतुयुक्त बेडका असलेले) शोधले गेले पाहिजेत.

या कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे

क्षयरोग हा एक गंभीर आणि घातक आजार आहे. परंतु तो बरा करता येतो. म्हणूनच शासनाने या आजाराला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

अधिकाधिक रुग्ण शोधण्यासाठी उत्तम रोगनिदानाच्या संभाव्य सेवा सर्वत्र उपलब्ध करणे ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे. यात मुख्य भर बेडक्याच्या सूक्ष्मदर्शक तपासणीवर आहे. प्रत्येक रुग्णाला उच्च गुणवत्तेची पुरेशी औषधे नियमितपणे आणि देखदेखीखाली दिली जात आहेत. एकदा रोगनिदान झाल्यावर त्या रुग्णाचा साठा वेगळा काढून ठेवला जातो.

समक्ष उपचार करणे हे या कार्यक्रमातले मुख्य सूत्र आहे. त्या त्या विभागातले आरोग्य कर्मचारी स्वत: हा समक्ष उपचार देतात.

तरीही या कार्यक्रमात काही त्रुटी राहून गेलेल्या आहेत. यात मुख्य भर जंतुयुक्त बेडका असणा-या रुग्णांवर असल्याने बाकीच्या रुग्णांकडे काही दुर्लक्ष होत आहे. दुसरे म्हणजे सुमारे 15 ते 20% रुग्ण उपचार होऊनही बरे होत नाहीत. त्यांचे जंतू या औषधांना सहज प्रतिकार करतात अशी शक्यता आहे. यासाठी हा कार्यक्रम फारसे काही करत नाही. त्यामुळे प्रतिकारक्षम जंतूंचे प्रमाण हळूहळू वाढत जाणार आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.