कानाचे आजार डोळ्याचे आजार
कानात किडा जाणे

कधीकधी झोपेत किंवा इतर वेळी कानात किडा जाण्याची शक्यता असते. आतल्या मळामुळे, अरुंद जागेमुळे आणि बाहेरून बोटाने प्रयत्न केल्यामुळे बहुधा किडा मरून जातो. पण किडा जिवंत असेल तर फडफडत राहतो. कधीकधी तो निसटून निघून जातो. किडा सहज निघत नसेल तर तेलाचे किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडचे थेंब टाकून निष्क्रिय करावा. नंतर हा किडा काढता येतो. पण तो ताबडतोब काढून टाकणे आवश्यक असते. साधा छोटा चिमटा वापरून किडयाचा भाग पकडून संपूर्ण किडा बाहेर काढता येईल. नंतर कान कोमट पाण्याने धुऊन टाकणे चांगले. हे न जमल्यास कानाच्या डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे.

कानात बी किंवा खडा जाणे

लहान मुले कानात बी, खडा, पेन्सिल, इत्यादी घालतात. टोकदार किंवा खरखरीत पदार्थ घातला असेल तर कानातील पडद्याला इजा होण्याचा संभव असतो. लहान मुले नीट माहिती सांगू शकत नाहीत. काही वेळा मूल घाबरल्यामुळे नीट माहिती कळत नाही. असे असले तरी आत गेलेला पदार्थ बी आहे की इतर पदार्थ हे ठरवणे आवश्यक आहे.

बी असल्यास कानात पाणी घालू नये. कारण पाण्याने बी हळूहळू फुगत जाते व ती कानातून काढणे अशक्य होते.

याउलट न फुगणारा पदार्थ (खडा, पेन्सिल, इ.) असल्यास कानात थोडे पाणी टाकावे. यामुळे तो पदार्थ कानात मोकळा होतो यानंतर कान जमिनीकडे केल्यावर पदार्थ पडून जातो. न पडल्यास निदान थोडासा बाहेर येतो. यामुळे तो काढणे शक्य असते.

मूल शांत रहात नसल्यास पदार्थ काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. नाही तर नाहक इजा होईल.

वस्तू काढण्यासाठी उपाय

safety pin कानात, नाकात गेलेल्या अशा वस्तू काढण्यासाठी दोन-तीन प्रकारची खास उपकरणे असतात. या उपकरणांना पदार्थाच्या मागे ओढण्याइतका बाक किंवा वाकडेपणा असतो. एक उघडमीट करणारा लहान वाकडा चिमटा असतो.

अशी उपकरणे नसतील तर साध्या सेफ्टी पिनचा टोक नसलेला वाटोळा भाग वाकवून घ्या. टोकदार भाग हातात धरून याचा वापर करून आत गेलेल्या पदार्थाच्या मागे नेऊन हळूहळू बाहेर ओढा. याने बहुधा तो पदार्थ बाहेर येतो. मात्र इजा न करण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कानातील वस्तू काढण्याची आणखी एक निर्धोक घरगुती पध्दत म्हणजे नळीच्या साहायाने खेचून घेणे. यासाठी साधी रबरी नळी वापरावी. कानाच्या आत जाईल इतकी ती लहान तोंडाची असावी. नळीची एक बाजू आपल्या तोंडात धरून दुसरे टोक त्या वस्तूवर लावावे; पण दाबू नये. मुलाचे डोके कोणालातरी पक्के धरून ठेवायला सांगावे. आता आपल्या तोंडातून हवा ओढण्याची क्रिया करावी. यामुळे हवेची पोकळी निर्माण होऊन कानातील वस्तू नळीने बाहेर खेचता येईल. बी असेल तर ती गुळगुळीत असल्याने सहज निघू शकते. या कामासाठी सलाईन सेटच्या नळीचा तुकडा वापरावा.

शक्यतो अशा कामासाठी तज्ज्ञाकडे पाठवणे बरे. पदार्थ निघाल्यानंतर कान तपासून आत इजा झाली की काय हे पाहावे.

नाकात वस्तू जाणे

कानापेक्षा नाकातले पदार्थ काढणे जास्त अवघड व धोक्याचे असते. हा पदार्थ बी असेल तर ती नाकातल्या पाण्याने हळूहळू फुगत जाते. शेंगदाणा, वाटाणा, हरबरा, चिंचोके, इत्यादी पदार्थ भिजल्यावर तुकडयातुकडयाने निघण्याची शक्यता असते. तसेच नाकात मागे खूप जागा असल्याने आणि शेंबूड असल्याने सहसा हा पदार्थ मागे घशात जातो. याचवेळी तो तोंडात येतो व मग थुंकता येतो.

पण अशा प्रसंगात तो पदार्थ श्वासनलिकेत जाण्याचा सदैव धोका असतो. श्वासनलिकेत असे पदार्थ जाणे अत्यंत धोकादायक व घातक ठरते. त्यामुळे श्वासनलिका किंवा एखादी उपनलिका (फांदी) बंद होण्याचा धोका असतो. मुख्य श्वासनलिका बंद झाल्यास श्वासोच्छवास थांबून मृत्यू संभवतो. पण उपनलिका बंद झाल्यास फक्त फुप्फुसाचा तेवढा भाग निकामी होतो. एकंदरीत नाकातला पदार्थ सहज दिसत असला तरच प्रयत्न करावा; अन्यथा कानाघ तज्ज्ञाकडे पाठवून द्यावे. (ब-याच वेळा हा पदार्थ भूल देऊन काढणे भाग पडते.)

बाह्यकर्णाच्या जखमा

कानाच्या पाळीला अनेक प्रसंगात जखमा होतात. कापलेली जखम असेल तर ताबडतोब शिवणे आवश्यक असते. मात्र कान चेंगरणे, चावणे, इत्यादी जखमा ब-या व्हायला वेळ लागतो. अशावेळी जंतुदोष नसल्यास कानाच्या जखमा लवकर भरून येतात. कारण या भागातला रक्तपुरवठा चांगला असतो.

राष्ट्रीय कर्णबधिरता नियंत्रण कार्यक्रम

beatings या वर्षापासून हा नवा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम सुरु झाला आहे.

भारतात दर हजार लोकसंख्येस सुमारे 3 जणांना गंभीर कर्णबधिरता असते. यातली बहुतेक मुलेच असतात. याचा त्यांच्या संपूर्ण जीवनावर दुष्परिणाम होतो. सौम्य कर्णबधिरता असणा-यांची संख्या यापेक्षा जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतात सरासरी 6% लोकांना कमीजास्त कर्णबधिरता असते.

उद्दिष्टे
  • कर्णबधिरता होऊ नये म्हणून प्रयत्न करणे. (प्रतिबंध) मुख्यत: जंतुदोष व इजा होणे या दोन कारणांनी येणारी कर्णबधिरता टाळता येते.
  • कर्णबधिरता लवकरात लवकर शोधून उपचार सुरु करणे. विशेषत: जन्मजात कर्णबधिरता लवकर शोधणे महत्त्वाचे आहे.
  • कर्णबधिरतेसाठी योग्य पुनर्वसनाची व्यवस्था करणे.
  • कर्णबधिरतेवर उपचार करण्यासाठी सुसज्ज केंद्रे तयार करणे. (कानाच्या प्रगत उपचारासाठी खूप यंत्रसामग्री लागते.)

भारत सरकारतर्फे 2006 ते 2008 या काळात यासाठी काही जिल्ह्यांमध्ये एक पथदर्शक कार्यक्रम घेण्यात आला आहे. यावर्षी (2008-09) पासून 2012 पर्यंत हा कार्यक्रम देशात 200 जिल्ह्यांमध्ये विस्तारला जाईल. मात्र या पथदर्शक प्रकल्पात महाराष्ट्रातील जिल्हे घेतलेले नाहीत. या कार्यक्रमात –

  • लोकांमध्ये कर्णबधिरतेबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कर्णबधिरतेची कारणे, प्रतिबंध लवकर निदान – उपचार, इ. गोष्टींबद्दल जाणीवजागृती करायची आहे.
  • प्राथमिक आरोग्यसेवेच्या विविध कार्यकर्त्यांना प्रतिबंध लवकर निदान – उपचार, इ. गोष्टींबद्दल काही विशेष प्रशिक्षण द्यायचे आहे.
  • प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर्सना विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
बधिरतेबद्दल आपल्याला उपयुक्त मुद्दे
  • बाळाला ऐकू येते की नाही हे 4 महिन्यांच्या आतच सहज ओळखता येते. असे असेल तर योग्य उपचार-प्रशिक्षण लवकरच सुरु करावे लागते.
  • कानाचे आजार (विशेषत: कान फुटल्यानंतर) लवकर बरे होतील यासाठी यासाठी योग्य उपचार करा, आवश्यक तेव्हा तज्ज्ञांकडे पाठवा.
  • आवाजाचे प्रदूषण कमी करणे. कारखाने, वाहतूक, लाऊडस्पीकर ही तीन कारणे महत्त्वाची आहेत.
  • वृध्द माणसांना जसा चष्मा लागतो, तसे कर्णयंत्र पण लागते. त्यांना स्वस्त व योग्य श्रवणयंत्रे उपलब्ध करणे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.