Children Health Icon नवजात बालकांची निगा बालकाची वाढ आणि विकास
नवजात बाळाच्या काही समस्या

बाळाचे डोके बाहेर आल्यावर पूर्ण बाहेर येण्याची वाट न पहाता बाळाचा श्वसनमार्ग साफ करावा.

उलटया होणे

कधीकधी जन्मल्यावर काही तासांतच मुलांना चिकट फेसासारख्या उलटया होऊ लागतात. बहुतेकदा जन्मताना बाळ आतले पाणी गिळते. बाळाभोवतालचे पाणी आणि कित्येकदा बाळाने आत टाकलेले मलमूत्र पाण्याबरोबर पोटात गेल्याने या उलटया होतात. बाळाला अंगावर पाजणे सुरू केल्यावर या उलटया थांबतात. बाळ अंगावर पीत असताना हवा गिळते. पाजून झाल्यावर जर उभे धरून ढेकर काढून टाकली नाही तर ढेकरेबरोबरच थोडेसे दूधही बाहेर काढते. यासाठी प्रत्येक वेळी पाजून झाल्यावर बाळाला छातीवर उभे धरुन पाठीवर थापटया देऊन ढेकर काढावी.

जर या उलटया थांबल्या नाहीत किंवा मूल हिरवट रंगाच्या उलटया करू लागले किंवा पोट फुगले तर मात्र लगेच डॉक्टरकडे पाठवावे. कदाचित, आतडयांमध्ये अडथळा निर्माण होऊन आतडी बंद झाली असण्याची शक्यता आहे.

तोंड येणे

बाळांना कधीकधी जिभेवर पांढरा थर धरतो. हा एक प्रकारचा बुरशीदोष आहे. यामुळे फारसा काही त्रास नसतो. पण जीभ चरचरल्यामुळे कधीकधी बाळ दूध ओढत नाही. बुरशीदोष पसरू नये म्हणून 1% जेंशन औषध जिभेवर एक-दोन थेंब दिवसातून दोन वेळा लावावे. एक थेंब औषधही खूप पसरते. हे औषध गिळले तरी अपाय होत नाही.

बाळास शी न होणे

जन्मल्यावर बहुधा पहिल्या 24 तासांत बाळ पहिली शी करते. जर 48 तासांतही शी केली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य. अंगावर पिणारे मूल क्वचित तीन ते चार दिवसांत एकदा शी करते. यात धोका काही नसतो. वयाच्या चार-पाच महिन्यांनंतर बाळाला शी रोजच्या रोज होऊ लागते.

बाळ शी करत नाही म्हणून किंवा जन्मल्यावर सर्व पोट लवकर साफ व्हावे म्हणून एरंडेल तेल चाटवण्याची पध्दत घातक ठरू शकते. शिवाय त्याची काही गरजही नसते.

कावीळ

जन्मलेल्या प्रत्येक बाळामध्ये तिस-या ते पाचव्या दिवशी थोडे काविळीचे प्रमाण दिसते. डोळयात व त्वचेवर पिवळेपणा, लघवी जास्त पिवळी, यावरून कावीळ कळते. हे काविळीचे प्रमाण थोडे वाढून नंतर 7 ते 10 दिवसांत कावीळ नाहीशी होते.

बाळाच्या शरीरात जन्मत: तांबडया पेशी जास्त प्रमाणात असतात. या तांबडया पेशींचा प्रकारही थोडा वेगळा असतो. आईच्या पोटातून बाहेर पडल्यावर नवीन प्रकारच्या रक्तपेशी आवश्यक असतात. म्हणून पहिल्या तीन -चार दिवसांत जुन्या रक्तपेशी मोडून नवीन प्रकारच्या रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. जुन्या पेशी मोडीत काढल्यावर बिलिरुबीन नावाचे पिवळे द्रव्य जास्त प्रमाणात तयार होते. यांचा निचरा करायला दोन-तीन दिवस लागतात, म्हणून कावीळ दिसते. म्हणजेच पहिल्या आठवडयात कावीळ दिसणे अगदी नैसर्गिक आहे. ही कावीळ दिसते व आपोआप नाहीशी होते. अपु-या दिवसांच्या मुलांमध्ये कावीळ उशीरा दिसते (5 ते 7 दिवस) व उशिरा जाते (12 ते 15 दिवस).

जन्मल्याजन्मल्या लगेच कावीळ दिसली किंवा ती जास्त दिवस टिकली किंवा जास्त प्रमाणात आहे असे वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एरवी या काविळीसाठी काहीही उपचार करण्याची गरज नसते.

नवजात बालकाच्या प्रतिक्षिप्त क्रिया

प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे संवेदना झाल्यावर मेंदूकडून आज्ञा न घेता चेतातंतू, चेतारज्जू व स्नायूंनी परस्पर पार पाडलेली हालचाल.

नवजात मुलामध्ये जागेपणी या क्रिया तपासणे अतिशय महत्त्वाचे असते. जर या क्रिया व्यवस्थित नसतील तर मेंदूची अपुरी वाढ, जन्मताना मेंदूला झालेली इजा अथवा रक्तामध्ये जंतुदोषाची शक्यता असते. म्हणून प्रत्येक नवजात बालकाच्या प्रतिक्षिप्त क्रिया तपासणे आवश्यक आहे. खालील 3 पैकी क्रिया न आढळल्यास तज्ज्ञाकडे पाठवून द्या.

1. दचकणे

ही क्रिया तपासण्यासाठी बाळाला खाली ठेवून बाळाच्या डोक्याखाली हात धरून तो हात अचानक खाली घ्या. बाळ अचानक दचकून त्याचे हात व पाय प्रथम अंगापासून बाजूला जातात. मग लगेच हातपाय पूर्वीसारखे दुमडले जातात व बाळ दचकून रडते.

2. तोंड वळवणे

आपल्या बोटाचा स्पर्श बाळाच्या ओठाच्या कडेपासून अलगद गालाकडे आणल्यास बाळ तोंड उघडून बोटाकडे वळवते.

3. चोखणे व गिळणे

आपले बोट (स्वच्छ धुऊन) बाळाच्या तोंडाला टेकवल्यास बाळ जोरात बोट चोखते. यामुळेच बाळ दूध किंवा पाणी गिळू शकते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.