Old Age Icon म्हातारपण
म्हातारपणातील आरोग्यसमस्या

‘वृध्दांसाठी आरोग्यशास्त्र’ ही एक आता स्वतंत्र शाखा झाली आहे. मात्र वृध्दांचे आरोग्याचे बरेच प्रश्न निरनिराळया वैद्यक तज्ज्ञांचे विषय असतात हे लक्षात ठेवले पाहिजे. सामान्यपणे वृध्दांच्या आरोग्यसमस्यांची यादी अशी करता येईल.

  • दात पडणे व खाता न येणे – अपचन-कुपोषण ही साखळी.
  • कमी दिसणे -त्यामुळे अपघात-अंथरूण धरणे.
  • ऐकायला कमी येणे-चिडचिडेपणा व संशयीपणा-मानसिक तणाव.
  • स्मृतीभ्रंश (अल्झायमरचा आजार)
  • पडल्यामुळे हात-पाय मोडणे.
  • वय वाढल्यामुळे होणा-या गाठी, कर्करोग, इ. समस्या,
  • पुरुषांमध्ये प्रोटेस्ट नावाच्या ग्रंथींची वाढ- त्यामुळे लघवीला त्रास व वागणुकीतले बदल.
  • स्त्रियांमध्ये स्त्री-संप्रेरकांच्या कमतरतेमुळे होणारे शारीरिक – मानसिक त्रास.
  • स्त्रियांमध्ये गर्भाशय बाहेर पडणे.
  • रक्तदाब वाढणे -त्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव- अर्धांगवायू, इ.
  • अति रक्तदाबामुळे आणि रक्तवाहिन्या जाड झाल्याने हृदयविकार जडणे.
  • झोपेचे प्रमाण कमी होणे आणि मानसिक त्रास.
  • सांधेदुखी – विशेषत: गुडघ्यांना आणि घोटयांना
  • जांघेत हार्निया होणे.
  • मधुमेह
  • स्थूलता
  • श्वसनाचा त्रास, दमा, श्वासनळीदाह, इ.
  • लकवा
  • हृदयरोग
  • मेंदूमधील रक्तस्त्रावामुळे अर्धांगवायू, पक्षाघात
  • मेंदूचे इतर आजार – स्मरणशक्ती कमी होणे
  • श्वसनसंस्थेचे आजार, खोकले, इ.
  • सांधेदुखी, सांध्याची हालचाल मर्यादित होत जाणे.
  • हाडे कमकुवत होत गेल्याने थोडया मारानेही अस्थिभंग होणे. (विशेषत: मनगट व खुब्याचे अस्थिभंग)
  • डोळयात मोतीबिंदू, लांबचे दिसणे पण जवळचे न दिसणे, कानांची श्रवणशक्ती कमी होणे.
  • अनेक प्रकारचे कर्करोग.

यांतील अनेक रोगप्रक्रिया अपरिवर्तनीय आहेत, उदा. सांधेदुखी, सांध्यात हालचाल कमी होत जाणे हे अटळ आहे. मोतीबिंदू होणे, चष्मा लागणे हेही अटळ आहे. श्रवणशक्ती कमी होण्यावरही उपाय नाही. मात्र योग्य आहार विहाराने या सर्व गोष्टी थोडया पुढे ढकलता येतात.

यांतले बरेच आजार हे थांबवता येत नाहीत कारण शरीर जीर्ण होत जाते. पण काही समस्यांना मात्र उत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. मोतीबिंदू , दात नसणे, पायाचे हाड तुटणे या तीनही प्रमुख समस्यांना अगदी चांगले उपाय आहेत. या उपायांनी वृध्दांच्या आयुर्मानात सरासरी दहावीस वर्षांची भर पडते.

कवळी

Denture दातांच्या कवळीमुळे म्हातारपण बरेच सुसह्य होते. यामुळे अन्न चावण्याची सोय होते. याचबरोबर बोलणे आणि चेहरेपट्टी चांगली राहणे हेही व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कवळीचे फारच फायदे आहेत. मात्र योग्य वेळी कवळी करून घेतली पाहिजे. एकदा केलेली कवळी 10-20 वर्षे सहज टिकते.

मधुमेह व अतिरक्तदाब

म्हातारपणातले काही आजार लवकर शोधून उपचार केल्याने आयुष्य वाढते. अतिरक्तदाब आणि मधुमेह हे दोन आजार लक्षात ठेवायला पाहिजेत. दोन्ही आजार ओळखायला सोपे आहेत. या दोन्हींसाठी साधे उपचार नियमित घेऊन चांगला उपयोग होतो.

वेदना कमी असते

वृध्दापकाळात वेदना थोडी कमी प्रमाणात होते. त्यामुळे आधी जे आजार फार जाचक वाटतात ते थोडे सौम्य वाटतात. काही आजारांमध्ये याचा फायदा होतो तर काहींमध्ये तोटा होतो. उदा. सांधेदुखी वगैरेमध्ये याचा फायदा होईल पण अल्सर, जठरव्रण सारखा आजार न कळल्याने घातक ठरू शकेल. अस्थिभंगाच्या बाबतीत हा अनुभव येतो. म्हाता-या माणसांना हाड मोडल्याची वेदना त्यामानाने कमी होते. पण त्या त्या आजाराप्रमाणे दखल घेतलीच पाहिजे.

वातावरणाचा त्रास

वातावरणातील बदल – विशेषत: थंडीचे दिवस – म्हातारपणात त्रासदायक ठरतात. थंडीत बरेच आजार बळावतात. यात सांधेदुखी, दमा, श्वसनाचे इतर आजार येतात. लहान मुले आणि म्हातारी माणसे यांना थंडीच्या बाबतीत तेवढाच त्रास होतो हे लक्षात घेऊन गरम कपडे वगैरे सोय केली पाहिजे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.