Roustabout Health Icon व्यवसायजन्य आजार आणि आरोग्य
कामकरी स्त्रिया

Working Women जेव्हा एखाद्या कामासाठी यंत्राचा शोध लागतो तेव्हा स्त्रियांना बाजूला सारून पुरुष त्या कामाचा ताबा घेतो असेही दिसून येते. उदा. गवत कापणे, भारे वाहणे हे काम स्त्रियांचे पण बैलगाडीत किंवा ट्रॅक्टरमधून ते भरून आणायचे असेल तर आपोआप ते काम पुरुषाकडे जाते. म्हणजे जास्त श्रमशक्ती लागणारे काम शेवटी स्त्रियाच पार पाडतात असे दिसते.

स्त्रियांना रोजगाराच्या कामाशिवाय 4-5 तास घरगुती कामही करावे लागते. दुसरे म्हणजे गरोदरपण, बाळंतपण, गर्भपात, स्तनपान, इ. शारीरिक जबाबदा-यांची त्यात भर पडत असते. स्त्रिया काम जास्त करतात पण मोबदला कमी मिळतो अशी परिस्थिती आहे.

स्त्रियांच्या विशेष समस्या आणि गरजा ध्यानात घेणे आवश्यक आहे. गरोदरपण, बाळंतपण, गर्भपात, इ. संबंधीच्या रजा, स्तनपानासाठी वेळ, लहान बाळांसाठी पाळणाघरे, स्वच्छतागृहे या सर्व सोयी करणे आवश्यक आहे.

स्त्रियांना कामावर पुरुषांकडून छळणूक सहन करण्याची अनेक उदाहरणे घडत असतात. चिडवणे, लगट करणे, मानसिक छळ करणे, बलात्कार, इ. प्रकार होत असले तरी त्याची वाच्यता फार होत नाही. या गोष्टी सिध्द करणे अवघड आणि सिध्द झाल्यानंतर समाज स्त्रियांनाच दूषण देणार ही परिस्थिती. याबद्दल स्त्रियांच्या अडचणी लक्षात घेऊन वातावरण बदलले पाहिजे. बहुतेक ठिकाणी रात्रीच्या पाळीला स्त्रियांना न ठेवण्याची पध्दत आहे. यासाठी प्रत्येक कारखान्यात महिला तक्रार निवारण समिती असणे कायद्याने अनिवार्य आहे.

स्त्रियांच्या अनेक व्यवसायांपैकी सर्वात अमानवी व्यवसाय म्हणजे वेश्याव्यवसाय. यात तर त्यांना दुख: आणि अनेक आजार सहन करावे लागतात. लिंगसांसर्गिक आजारांचे पुढचे सर्व परिणाम वंध्यत्त्व, पोटदुखी, इत्यादी त्यांना भोगायला लागतात. एड्स हा आजार तर हजर असतोच.

बालकामगार

Child Labor बालकामगार असणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कुरूप लक्षण आहे. कुटुंबाचा दारिद्रयाचा भाग मुलांच्याही वाटयाला येणार आणि त्यामुळेच बालकामगार ही समस्या आहे. केवळ कायद्याने बालकामगार प्रथा बंद पडणे अवघड आहे. जेव्हा आईबापांच्या कमाईतून कुटुंबाचे आज-उद्याचे भागेल तेव्हाच त्या कुटुंबातली मुले बालसुलभ शिक्षण, खेळ, इत्यादी क्षेत्रांत जातील. अर्थातच तोपर्यंत कायदा पालनाचा आग्रह धरणे योग्यच आहे.

बालकामगारांचा सर्वात उपेक्षित भाग शेती-क्षेत्रात आहे. इथे ते फार जाचक न दिसता निसर्गात चपखल बसून जाते. गुरे वळणे, जळण गोळा करणे, राखण करणे, पिकांची लावणी, कापणी वगैरे अनेक कामात मुले राबतात. मुलींना तर मुलांपेक्षा अनेक पटींनी जास्त काम असते. त्यामुळे त्या धड शिक्षणही घेऊ शकत नाहीत.

बिगरशेती क्षेत्रात मुले मुख्यत: हॉटेल, घरगुती व लहान उद्योग (उदा. बिडी वळणे) वगैरे ठिकाणी काम करतात. काही घातक उद्योगांतही मुलांचे प्रमाण खूप आहे. त्यात दिवाळीच्या दारू सामानाचे कारखाने सर्वात पुढे आहेत. तासनतास एकटक काम करत राहणे, अपु-या सोयी, अपुरे वेतन, अपुरे पोषण हे सर्व इथे पाचवीलाच पुजलेले असते. .

कायद्याने चौदा वर्षाखालील मुलांना कामावर लावण्याची मनाई आहे. चौदा वर्षावरची मुले (अठरापर्यंत) चार तासांपेक्षा अधिक काम करणार नाहीत असेही बंधन आहे. प्रत्यक्षात हे केवळ कागदावर असते. कारखान्यांबाहेर हे कायदे कोण पाळणार? वेश्याव्यवसायात तर बालिकांचे सर्वतोपरी शोषण होते. मुलींबरोबर मुलेही यात शिकार होतात. कायद्याने बंदी असली तरी राजरोसपणे हे भारतासहीत अनेक देशात चालू आहे.

लैंगिक शोषण

बालकामगारांच्या समस्येत आणखी एक भर म्हणजे बालकांना लैंगिक विकृतीसाठी वापरणे. अनेक कामाच्या ठिकाणी तर हे होतेच पण अनेक विदेशी पर्यटकांच्या घृणास्पद लैंगिक भुकेमुळे काही देश त्रस्त झाले आहेत. भारतातली पर्यटनस्थळेही आता या यादीत आहेत. मुंबईसारख्या महानगरांमध्ये वेश्याव्यवसायात कोवळ्या मुलींनाच जास्त भरती करतात ही कटू वस्तुस्थिती आहे.

आर्थिक प्रश्न

बालकामगार समस्येची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर आता घेतली जात आहे. त्यात मानवतावाद आहे पण आर्थिक स्वार्थही गुंतला आहे. बडया देशांत बालकामगारांसारखे स्वस्त श्रम मिळत नाहीत. त्यामुळे तेथे वस्तू उत्पादन महाग होते. या उलट गरीब देश स्वस्त बालकामगार वापरून किंमतीत स्वस्ताई ठेवतात म्हणून मालाच्या स्पर्धेत त्यांना फायदा मिळतो. तरीही बालकामगार असणे हे दु:ख दारिद्रयाचे द्योतक आहे. कधी ना कधी त्याचे उच्चाटन व्हायला पाहिजे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.