Medicine Law Icon आरोग्य कायदा
‘मारझोड’ कशी ओळखावी?

बाई मारहाण लपवत असली तरी ती ओळखून काढणे हे आवश्यक आहे. आरोग्य कार्यकर्ते किंवा शेजारी-पाजारी हे काम करू शकतात.

  • एखादी बाई अंगदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, इत्यादी ‘दुखी’ घेऊन नेहमीनेहमी दवाखान्यात येत असेल (अशावेळी कारण म्हणून त्या बहुतेक असे सांगतात – काम करताना पडले, खूप काम करावे लागते, ताप, इ.)
  • जखम झाल्यावर 1,2,3 दिवसांनी उपचारासाठी येणारी बाई ! कदाचित मारझोडीमुळे ही जखम झाली असेल. त्यादिवशी तिला येऊ दिले नसेल किंवा संध्याकाळ-रात्र झाल्यामुळे ती बाहेरच पडली नसेल. ‘जुनी जखम’ ही महत्त्वाची खूणगाठ लक्षात ठेवा. उपचारासाठी एवढा उशीर का केला असे विचारले तर ती बहुधा काहीतरी उत्तर देईल – (वेळ मिळाला नाही, पाळी आलेली होती, मुलांच्या शाळा, शेतात तातडीचे काम होते वगैरे वगैरे)
  • मुकामार/जखम, ती पण अशा ठिकाणी की पडल्यामुळे तिथे लागू शकत नाही. पडल्यामुळे होणा-या जखमा गुडघे, छाती, पोट, चेह-याचा पुढचा भाग, हाताचे तळवे, कोपर कुल्ले, इ. ठिकाणी होऊ शकतील. बाई सांगते ते कारण व मुकामार/ जखम याची संगती लागत नसेल तर शंका घ्यावी. बचावासाठी मनुष्य हातांचा ढालीसारखा वापर करतो, त्या जखमा सहज कळतात. जखमांच्या जागा व स्वरूप यावरून कारण समजू शकते.
  • तोंडाने कारण सांगत असताना डोळे/चेहरा वेगळीच कहाणी सांगतात, ती ओळखणे आवश्यक आहे. यासाठी अर्थातच आपण सहृदय व जागृत असले पाहिजे.
  • मारहाणीच्या जुन्या खाणाखुणांवरून शंका घेता येईल.

आपली भूमिका

Your Role कोठल्याही चांगल्या समाजात हिंसा असायला नको. निदान निरपराध व्यक्तींना हिंसा-मारहाणीला तोंड द्यायला नको. त्यातही ज्याच्यावर संरक्षणाची जबाबदारी त्यांनीच मारहाण करणे हे आणखीनच वाईट. या दृष्टीने शेजारी-पाजारी व समाजाचे घटक, राष्ट्राचे नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहे. ‘मी काय करणार’ , ‘त्याची बायको, तो तिला मारणारच’ ‘नव-याने मारले पावसाने झोडले’, इत्यादी मनोभूमिका बदलायला हवी. घरातल्या मारहाणी थांबवण्यासाठी आपण शक्यतो प्रत्येक स्त्रीला मदत करायला हवी.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.