डोळ्याचे आजार कानाचे आजार
डोळे येणे

conjunctivitis डोळे येणे म्हणजे अचानक डोळयांची जळजळ, दुखणे, पाणी व घाण येणे, पापण्या चिकटणे व प्रकाश सहन न होणे. हा आजार सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुधा हा आजार साथीच्या स्वरूपात येतो. त्याचे कारण बहुतेक वेळा सूक्ष्मजंतू (जिवाणू-विषाणू) हेच असते. मात्र काही वेळा रासायनिक पदार्थ, धूळ, वावडे, प्रखर प्रकाशकिरण (उदा. वेल्डिंग) यामुळेही डोळे येतात. या कारणाने डोळयात नेत्रअस्तराचा दाह निर्माण होतो. दाहाची सर्व लक्षणे यात दिसतात. (सूज, लाली, पाझर, वेदना आणि काम मंदावणे.)

रोगनिदान

वरील खाणाखुणांवरून डोळे आलेले लगेच कळते. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुबुळावर बारीकशी देखील जखम आहे किंवा नाही हे पहावे. डोळे येणे बहुतेक वेळा बुबुळाच्या आजूबाजूच्या ‘नेत्रअस्तर’ या पातळ अस्तरापुरतेच मर्यादित असते. क्वचित हा पातळ पडदा खूप सुजतो. पण बुबुळ सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे. बुबुळ तपासणीत जर जखम आढळली तर फार काळजी घ्यावी लागते. नाही तर डोळयात फूल पडण्याची (पांढरट डाग) भीती असते. म्हणून अशा वेळी तज्ज्ञाकडे पाठवून द्यावे.

उपचार

eyes drop जंतुदोषामुळे उद्भवलेले ‘डोळे येणे’ संसर्गजन्य असते, हे जंतू हातरुमाल, कपडे व हवा यांमार्फत पसरतात, म्हणून त्याबद्दल योग्य ती काळजी घ्यावी. एकमेकांचे कपडे, हातरुमाल, चष्मे वापरू नये.

डोळे येण्याची शंका किंवा सुरुवात असल्यास झोपताना दोन्ही डोळयांत एरंडेल तेल काजळाप्रमाणे लावावे. ब-याच वेळा यामुळे आजार थांबतो. इतरांसाठी प्रतिबंधक उपाय म्हणूनही हा उपाय चांगला आहे.

डोळयांत टाकण्यासाठी निरनिराळया जंतुविरोधी औषधांचे थेंब किंवा मलम मिळते. डोळयाचे मलम दिवसातून दोन – तीन वेळा लावावे. किंवा थेंब असल्यास दिवसातून सहा-आठ वेळा घालावेत. हे औषध पाच दिवसांपर्यंत घालावे. औषध/मलम दोन्ही डोळयात वापरावे. याने बहुतेक वेळा आराम पडतो. पण आराम न पडल्यास औषध बदलावे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरकडून योग्य औषधांबद्दल सल्ला मिळेल. साथीच्या विकारात बहुधा एखादे विशिष्ट औषध सर्वांना लागू पडते.

बुबुळावर जखम दिसत असल्यास याच प्रकारची काळजी आवश्यक आहे. मात्र लगेच नेत्रतज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.

होमिओपथी निवड

आर्सेनिकम, बेलाडोना,युफ्रेशिया, फेरम फॉस, लॅकेसिस, मर्क कॉर, नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर

नवजात अर्भकाचे डोळे येणे

जन्मल्यानंतर पहिला आठवडाभर बाळाचे डोळे रोज उघडून तपासणे चांगले. कधीकधी बाळ डोळे मिटून राहते-उघडत नाही. याचे कारण ‘डोळे येणे’ हे असू शकेल. जन्मताना योनिमार्गातील जंतू (विशेषत: गोनोरियाचे जंतू) डोळयांत गेल्यास असा आजार होऊ शकतो. यामुळे एक-दोन दिवसांतच डोळे येतात. यावर डोळयांचे थेंब (सल्फा) टाकणे व लक्ष ठेवणे हाच उपाय आहे. यात दुर्लक्ष झाल्यास दोन-चार दिवसांतच डोळयांमध्ये फूल पडण्याची शक्यता असते. प्रत्येक बाळाच्या डोळयांत थेंब टाकण्याची आवश्यकता नसते. परंतु प्रत्येक बाळाच्या डोळयांवर रोज लक्ष ठेवणे मात्र आवश्यक आहे.

दृष्टी तपासणी
vision inspection
vision inspection
vision inspection
 

दृष्टीदोष असेल तर नेत्रतज्ज्ञ विशिष्ट तक्ते वापरून व यंत्राने तपासणी करतात. तक्त्यांवर ओळीखाली ओळीने लहान अक्षरे असतात. निरक्षर लोकांसाठी अक्षरांऐवजी ठिपक्यांचे पुंजके किंवा इंग्रजी सी अक्षराचा बोर्ड असतो. या ऐवजी चित्रांचे तक्तेही मिळतात.

सर्वात वरचे आणि मोठे अक्षर निरोगी डोळे असलेल्या व्यक्तीस 60 मीटर्सवरूनही वाचता आले पाहिजे. तसेच सर्वात लहान अक्षर 6 मीटरवरून वाचता यावे. या दोन्हींच्या मध्ये असलेल्या अक्षरांखाली मीटरचा आकडा लिहिलेला असतो. प्रत्यक्षात तपासणीसाठी तक्त्यापासून 6 मीटर दूर उभे राहून तक्ता वाचायला सांगतात. (खोली लहान असल्यास अंतर वाढवण्यासाठी आरसा वापरतात). तपासताना दुसरा डोळा झाकून एकेक डोळा तपासला जातो.

आपल्याला 6 मीटरवरून सर्वात खालची ओळ स्पष्टपणे वाचता आली तर दृष्टी 6/6 म्हणजे ‘योग्य’ आहे असे समजतात (काही व्यक्तींची दृष्टी यापेक्षा चांगली असते व ते 6 मीटरपेक्षा खालची ओळ वाचू शकतात).

6 मीटरवरून फक्त वरची ओळ वाचता आली तर 6/60 म्हणजे अगदी कमी दृष्टी आहे असे समजले जाते. याप्रमाणे 6/36, 6/24, 6/12, इत्यादी नोंद केली जाते.

चष्म्याचा अचूक नंबर काढण्यासाठी नेत्रतज्ज्ञ यंत्राने आणखी तपासणी करतात.

दृष्टी फारच अधू झाली असेल तर तक्ते वाचणे शक्य नसते. अशा वेळी हाताची बोटे दाखवून किती आहेत हे मोजावयास सांगतात. बोटे मोजता येतात त्या अंतरावरून दृष्टीचा अंदाज काढता येतो. (उदा. दोन फुटांवरून बोटे मोजता येतात, इ.) पण दृष्टीज्ञान यापेक्षा चांगले असल्यास तक्त्यांचा वापर करावा.

याशिवाय रंगज्ञान तपासले जाते. काही व्यक्ती रंगांध असतात. (अशा व्यक्तीला वाहन चालकाचा परवाना दिला जात नाही)

दृष्टीतपासणीत काचबिंदू आहे, नाही याची खात्री करण्यासाठी डोळयातील दाब तपासला जातो. यासाठी बोटाने अंदाज घेता येतो. मात्र अचूक तपासणीसाठी टोनोमीटर लागतो.

याचबरोबर नेत्रपटल तपासणी (फंडोस्कोपी) केली जाते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.