Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
क्षयरोग

Tuberculosis Reason क्षयरोग हा विशिष्ट सूक्ष्म जंतूमुळे, म्हणजे जिवाणूंमुळे होणारा आजार आहे. क्षयरोग हा सामान्यपणे फुप्फुसाचा आजार असला तरी आतडी, त्वचा, रसग्रंथी, मेंदू, सांधे, हाडे, इत्यादी निरनिराळया अवयवांमध्ये तो होऊ शकतो. आपल्या देशात याचे प्रमाण फार म्हणजे हजारी 20 ते 30 इतके आहे. सर्व वयोगटांत हा आजार आढळतो. पण लहान मुलांमध्ये आणि मोठया माणसांत या रोगाचे वेगवेगळे रुप दिसते.

निकृष्ट राहणीमान हे क्षयरोगाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. इंग्लंड-युरोपमध्ये एकेकाळी मोठया प्रमाणावर होता. हा आजार तेथले राहणीमान सुधारताच खूपच कमी झाला. त्या वेळी क्षयरोगाची औषधे अजून निघायची होती. आपल्याकडे मात्र औषधे निघूनही क्षयरोगाचे प्रमाण खूप आहे. याचे कारण हेच, की गरिबीचा प्रश्न आपण सोडवू शकलो नाही. अपुरा आहार, अपुरी कोंदट घरे, गोठयासोबत राहणे, औषधपाण्याची सोय नाही अशा परिस्थितीत क्षयरोग टिकून आहे. रस्त्यावर व इतरत्र थुंकण्याची सवय अगदी वाईट खरी, पण हे क्षयरोगाचे मुख्य कारण नाही.

क्षयरोग हवेवाटे, श्वासावाटे पसरतो. तरी गरीब वस्त्यांमधून सर्रास आढळणारा क्षयरोग सुखवस्तू समाजात कमीच आढळतो. क्षयरोगाबरोबर लढाई करायची असेल तर सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि राहणीमान सुधारणे महत्त्वाचे आहे.

क्षयरोग हा सौम्य पण दीर्घ प्रकारचा दाह आहे. हा आजार महिनोनमहिने चालतो. यातही दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे लहान मुलांमध्ये होणारा क्षयरोग. दुसरा प्रौढ वयात येणारा क्षयरोग.

लहान वयातला प्रकार : प्रथम क्षयरोग

Small Age Tuberculosis लहान मुलांच्या क्षयरोगाच्या प्रकारात शरीराचा जंतूंशी प्रथमच संबंध येतो. यात फुप्फुसात एक ठिपक्याइतका डाग तयार होतो. बालकाची प्रतिकारशक्ती अजून तयार झाली नसल्याने छातीतल्या रसग्रंथीपर्यंत वेगाने जंत पोचतात. यामुळे छातीतल्या रसग्रंथी सुजतात. या सर्व घडामोडीत मुलाला सहसा त्रास होत नाही. यामुळे रोगाला रसग्रंथीतच अटकाव होतो. काही महिन्यांनी असा आजार पूर्ण बरा होतो. याची वरून काहीही लक्षणे-चिन्हे नसतात.

असा प्रथम क्षयरोग आजार फक्त छातीचे क्ष-किरण चित्र व कातडीवरची विशेष परीक्षा (टीटी) करूनच कळू शकतो. काही वेळा याबरोबर छातीतल्या रसग्रंथी सुजल्याने गिळायला थोडाफार त्रास होतो.

भारतात बहुसंख्य व्यक्तींना हा प्राथमिक आजार होऊन गेलेला असतो. तो कळत पण नाही. मात्र काही बालकांचा प्राथमिक आजार बरा होत नाही. यातून खालीलप्रमाणे दोन फाटे फुटतात.

(अ) काही मुलांमध्ये प्रतिकारशक्ती मुळात अपुरी असते. यामुळे क्षयरोग रसग्रंथीच्या पलीकडे निरनिराळया इतर अवयवांत (मेंदू, मणके, सांधे, हृदय, इ.) पसरतो. ज्या अवयवांचा आजार होतो त्याप्रमाणे लक्षणे-चिन्हे असतात.

(ब) याउलट काही मुलांमध्ये फुप्फुसातच जागच्या जागी आजार वाढत राहतो. या फुप्फुसांच्या आजारात न थांबणारा खोकला, बारीक ताप, रोडपणा, वाढ मंदावणे, कुपोषण, इत्यादी लक्षणे आढळतात.

रोगनिदान

ब-याच मुलांमध्ये हा सौम्य चिवट आजार कळून येत नाही. मुद्दाम शंका घेऊन खास तपासणी केली तरच निदान होते. यासाठी छातीचा क्ष किरण फोटो उपयुक्त असतो.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.