Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
दम-लागणे

breathless शरीराच्या गरजेइतका प्राणवायू मिळत नसला तर श्वसनसंस्था व हृदय जास्त काम करून प्राणवायू पुरवण्याची धडपड करतात. यालाच आपण ‘दम लागणे’ म्हणतो. यात श्वास जोरात, वेगाने व खोलवर चालतो व हृदयाची धडधड जाणवते.

कारणे
  • रक्तपांढरी : रक्तामध्ये रक्तद्रव्याचे प्रमाण कमी असेल (ऍनिमिया, रक्तक्षय) तर रक्ताची प्राणवायू वाहण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे रक्तप्रवाह वाढवून वेळ मारून नेण्याचा हृदय प्रयत्न करते. बहुधा असा दम नेहमीपेक्षा थोडेसे जास्त काम पडले तर लगेच लागतो. विश्रांतीने हा त्रास कमी होतो. या आजारात शरीर निस्तेज व पांढरट दिसते.
  • हृदयक्रियेतला दोषः हृदयामध्ये काही दोष असला, झडपा नीट मिटत नसल्या किंवा कप्प्यांना छिद्र असेल किंवा खुद्द हृदयाचा रक्तपुरवठा नीट व पुरेसा होत नसेल तर हृदयातर्फे रक्त ढकलण्याची क्रिया मंदावते. त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरवठा व्हावा तितका होत नाही. थकवा येणे, जास्त श्वास लागणे, धडधड होणे वगैरे अनुभव येतो. कित्येकदा ओठ किंवा कातडी निळसर दिसते (म्हणजेच प्राणवायू अपुरा पडतो).
  • श्वसनसंस्थेतला दोष: श्वासनलिका व फुप्फुसे यांमध्ये काही दोष असेल तर रक्तद्रव्य पुरेसे असून व हृदय व्यवस्थित चालूनदेखील दम लागतो. कारण रक्तामध्ये प्राणवायू मिसळणे आणि कार्बवायू बाहेर काढणे हे काम नीट होत नाही. श्वसनसंस्थेत पुढीलप्रमाणे अनेक दोष असू शकतात. एक म्हणजे सतत धूम्रपानामुळे श्वासनलिका व पुढे निघणा-या नळया बारीक होत जातात. यामुळे हवेचा पुरवठा जास्त दाबाने करावा लागतो. नळी बारीक झाल्याने हवेचा पुरवठा कमी पडतो. तसेच वावडे (ऍलर्जी) किंवा कोंदट पावसाळी हवेमुळे श्वासनलिका व त्यापुढच्या नळया आकसून लहान होतात. यामुळे हवेचा पुरवठा कमी पडतो. फुप्फुसांचा मोठा भाग क्षयरोग, न्यूमोनिया, कॅन्सर वगैरेंमुळे निकामी झाला असेल तरीही हवेचा पुरवठा कमी पडतो. याशिवाय फुप्फुसांच्या आवरणामध्ये पाणी साचले असेल (उदा. क्षयरोग) किंवा पू झाला असेल तर फुप्फुसांमध्ये हवा खेळण्यात अडथळा येऊन दम लागतो.

दम लागण्याचे निश्चित कारण शोधण्यासाठी तज्ज्ञाकडे पाठवा.

पायावर सूज

पायावर सूज हे तसे क्वचित आढळणारे लक्षण आहे. या लक्षणांमागे अनेक शरीरसंस्थांचे निरनिराळे आजार असू शकतात. सोबतच्या तक्त्यात व मार्गदर्शकात पाहून आपल्याला त्याचे चांगले निदान करता येईल.

पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सूज एका पायावर आहे, की दोन्ही पायांवर आहे हे लक्षात घ्या. सूज एका पायावर असेल तर बहुधा ‘स्थानिक’ स्वरूपाचे म्हणजे त्या पायाशी संबंधित आजार असतात. सूज दोन्ही पायांवर असेल तर, गर्भाररोग, हृदय, यकृत, मूत्रपिंड यांचे आजार, कुपोषण-रक्तपांढरी, अन्नविषबाधा किंवा हत्तीरोगाची असते. म्हणून दोन्ही बाजूंस सूज असेल तर तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे हे लक्षात घ्या. या सर्व आजारांची थोडीशी माहिती या पुस्तकात प्रकरणाप्रमाणे दिली आहे.

गर्भाररोग म्हणजे गरोदरपणात पायावर सूज येणे, लघवीत प्रथिने येणे, इ. लक्षणचिन्हांनी ओळखला जाणारा आजार. हा आजार गंभीर आहे, म्हणून वेळीच तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.

बोटाने दाबल्यावर खड्डा पडतो?
Swelling on the Feet
Swelling on the Feet

सुजलेल्या भागावर दाबून खड्डा पडतो की नाही हे तपासणे हा पुढचा महत्त्वाचा मुद्दा. यासाठी पावलावर किंवा घोटयावर अंगठयाने जोराने दाबून पहा. बोट काढल्यावर खड्डा हळूहळू भरून येत असेल तर ही सूज ‘पाणी जमून’ आलेली आहे हे निश्चित. दोन्ही पायांवरची सूज असेल तर सर्व संबंधित आजारांत बोटाने दाबून खड्डा पडतो. म्हणजेच दोन्ही पायांवरची सूज ही बहुधा ‘पाणी जमून’ येते.

एका पायावरच्या पाणी जमून येण-या (म्हणजेच खड्डा पडणा-या) सुजेमागे प्रथमावस्थेचा हत्तीरोग, जंतुदोष, प्राणिदंश (उदा. सापाचा दंश), वावडे आणि त्या बाजूच्या रक्तप्रवाहात अडथळा (उदा. नीला बंद होणे) ही कारणे असतात. यांतले जंतुदोष, वावडे, हत्तीरोगाची प्रथमावस्था यांवर आपण प्राथमिक उपचार करू शकतो.

एका पायावरची खड्डा न पडणारी (म्हणजे घट्ट) सूज असेल तर तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.

पायावरच्या सुजेमागे अनेक गंभीर कारणे असतात. तरी जंतुदोष व हत्तीरोगाच्या संसर्गाच्या प्रदेशात ही सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी कारणे आहेत. त्यावर आपण प्राथमिक उपचार करू शकतो. मात्र रोगनिदान करूनच उपचार करावा.

पायावर सूज (तक्ता (Table) पहा)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.