Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
सांसर्गिक कुष्ठरोग
Leprosy Skin Scars
Leprosy Face Swelling

हा सांसर्गिक कुष्ठरोग अगदी कमी प्रतिकारशक्तीच्या माणसांत आढळतो. हा रोग बरा व्हायला पहिल्या प्रकारापेक्षा जास्त वेळ लागतो. हा आजार लवकर ओळखायला जास्त अवघड असतो. शरीरात त्याचा प्रसार (असांसर्गिक कुष्ठरोगापेक्षा) जास्त असतो. या प्रकारात कातडीवर लालसर किंवा फिकट चट्टे पडतात. मात्र हे चट्टे जाड नसतात, बधिरताही नसते. चट्टा कुठे सुरू होतो व कुठे संपतो हे सांगणे अवघड असते.

या प्रकारात चेतातंतू /नसांना सूज उशिरा येते. त्यामुळे बधिरता, लुळेपणा, अवयव आखडणे, पायावर जखमा तयार होणे वगैरे त्रास उशिरा (काही वर्षानंतर) होतात. बारकाईने पाहिल्यास यात भुवयांचे केस झडलेले दिसतात. कानाच्या पाळया जाडसर दिसतात. लवकर रोगनिदान व उपचार केल्यास हा आजार आटोक्यात येऊ शकतो व इतरांना संसर्ग होणे टळू शकते.

सांसर्गिक कुष्ठरोगाचा जास्त त्रासदायक असलेला प्रकार म्हणजे कातडीवर ठिकठिकाणी गाठी तयार होणे.

पुरुषांना या ‘सांसर्गिक कुष्ठरोग’ प्रकारात काही वर्षानी काखेतले केस, दाढी विरळ होणे, इत्यादी लक्षणे दिसतात. बीजांडामध्ये आजार शिरल्याची ही सर्व लक्षणे आहेत. बीजांडात आजार शिरल्यास पुरुषांमध्ये स्तनांचा आकार वाढत राहतो. याबरोबरच हाडांमध्ये आजार शिरून हाडे ठिसूळ होतात. नाकाचे हाड त्यामुळेच बसते. बधिरतेने अनेक परिणाम होतात – डोळयांमध्ये बुबुळावर जखमा होतात.तसेच टाचा व चवडे यांच्यावर जखमा होतात.

कुष्ठरोगाचे मुख्य प्रकार : तुलना (तक्ता (Table) पहा)

कुष्ठरोगाची तपासणी

कुष्ठरोगासाठी करायची तपासणी अत्यंत सोपी आहे. खालीलपैकी एकतरी खूण कुष्ठरोगात प्रारंभिक अवस्थेतच आढळू शकते.

  • यासाठी त्या व्यक्तीला आधी डोळे मिटायला सांगा. संशयित फिकट किंवा लालसर चट्टयावर बॉलपेनचा स्पर्श करून जाणवते की नाही ते तपासा.
  • चेतातंतूंची तपासणी प्रत्येक बाजूला हातावर 3 ठिकाणी तर पायावर 2 ठिकाणी करायची आहे. याच्या जागा ठरलेल्या आहेत. त्या ठिकाणी चेतातंतू/नस जाडसर किंवा दुखरी असणे ही महत्त्वाची खूण धरा. विशेषकरून कोपरामागे, गुडघ्यामागे, घोटयामागे तपासावे
  • ज्या संशयित व्यक्तींमध्ये वरील दोन्ही खाणाखुणा सापडत नाहीत त्यांच्या कानाच्या पाळीच्या व बाधित त्वचेच्या नमुन्याची सूक्ष्मदर्शक तपासणी करावी लागते.
रोगनिदानासाठी लक्षण-चिन्हे

खालीलपैकी लक्षणे असल्यास कुष्ठरोगाची खात्री करून घ्यावी.

  • न खाजणारा चट्टा (पांढरट किंवा तेलकट किंवा जाडसर)
  • एखाद्या भागावर दीर्घकाळ बधिरता
  • चवडे किंवा टाचा, तळव्यावर न भरून येणारे व्रण (जखमा)
  • हाताच्या किंवा पायाच्या बोटामध्ये वाकडेपणा येणे
  • भुवया विरळ होणे किंवा दाढीचे केस विरळ होणे
  • कानाच्या पाळया जाड होणे.

चट्टा
शंका आल्यावर पूर्ण तपासणी करावी. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचा-यांची मदत घ्या. कुष्ठरोगाचा हा प्रकार सांसर्गिक आहे की असांसर्गिक आहे हे तक्त्यावरुन ठरवता येते.

चट्टा

चट्टा हा कुष्ठरोगाची एक महत्त्वाची खूण आहे. यासाठी आडोसा करून त्या व्यक्तीला तपासा. यासाठी योग्य उजेडात पूर्ण शरीर तपासा.

जन्मापासून असणारा किंवा येणारा-जाणारा चट्टा कुष्ठरोगाचा असत नाही.

चट्टा हा एकतर जाडसर, तेलकट आणि लालसर असेल. किंवा चट्टा फिकट, सपाट आणि अस्पष्ट कडांचा असेल.

चट्टयावर बधिरता असेल.

काहीजणांच्या बाबतीत कातडीवर गाठी असू शकतात. चट्टयांची जागा व संख्या नोंदवून ठेवा. याचा पुढे उपयोग होतो.

कुष्ठरोगाचे निदान व उपचार आता खूप सोपे झाले आहे.

प्रकार 1- एक चट्टा : शरीरावर कोठेही केवळ एखादा चट्टा, परंतु चेतातंतूस कोणतीही बाधा नाही.

प्रकार 2 – अल्पजंतू कुष्ठरोग – 2 ते 5 चट्टे, चेतातंतूला सूज नसणे (एखादी नस सुजू शकते) त्वचा तपासणीत कुष्ठरोगाचे जंतू क्वचित आढळतात.

प्रकार 3 – सांसर्गिक (बहुजंतू) कुष्ठरोग – 5 पेक्षा जास्त चट्टे, एकापेक्षा जास्त चेतातंतू सुजणे. त्वचा सूक्ष्मदर्शक तपासणीत पुष्कळ जंतू सापडतात.

बहुविध उपचार

प्रकार 1 – केवळ एकच डोस पुरतो.
प्रकार 2 – फक्त सहा डोस दरमहा एक पॅक (एकूण — महिन्यात पूर्ण करावा.
प्रकार 3 – फक्त 12 डोस दरमहा एक पॅक (एकूण 11 महिन्यांत पूर्ण करावे.)

  • बहुविध उपचारांनी कोणताही कुष्ठरोग 6 महिने ते वर्षभराच्या आत पूर्ण बरा होतो.
  • मात्र त्यामुळे चट्टे व कातडीवरचा रंगबदल पूर्णपणे जात नाही. तसेच झालेली विकृती बरी होत नाही. फक्त पुढे व्हायची टळते.
  • गर्भवती स्त्रिया-पुरुष- मुले या सर्वांसाठी बहुविध उपचार सुरक्षित आहेत. फक्त यकृत, मूत्रपिंडाचे आजार असतील तर डॉक्टरांना आधी पूर्ण कल्पना द्यायला पाहिजे.
उपचारांमुळे रिऍक्शन

उपचारांमुळे कधीकधी काही रुग्णांना ‘रिऍक्शन’ येऊ शकते. यासाठी खालील लक्षणे लक्षात ठेवा.

  • असलेल्या चट्टयांचा आकार, रंग अचानक बदलणे.
  • जास्त चट्टे येणे.
  • नसांच्या आजूबाजूला अचानक चट्टे उमटणे.
  • त्वचेखाली अचानक अनेक गाठी येणे. या गाठी लालसर, दुख-या असतात.
  • हाडे, सांधे दुखणे, डोळे येणे, अंडगोल दुखणे, इ.
  • अचानक ताप, थकवा येणे

अशी लक्षणे असतील तर ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवले पाहिजे. अशा रुग्णांना विशेष उपचार करावे लागतात.

या आजारासाठी आता आधुनिक बहुविध उपचारपध्दती यशस्वी ठरते. यात डी.डी.एस., क्लोफाझिमिन आणि रिफॅपिसिनच्या एकत्रित गोळया असतात. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर बहुविध उपचारपध्दती उपलब्ध असते.

कुष्ठरुग्णांसाठी हातापायांची विशेष काळजी
  • रुग्णाला हातापायांची काळजी घ्यायला शिकवा.
  • लक्ष दिल्यास जखमा होत नाहीत. यासाठी खिळे नसलेले पादत्राण वापरावे. मऊ चपला किंवा स्लिपर चांगली. तसेच बूट मऊ वापरावेत.
  • जखमांची तपासणी स्वत: करावयास शिकवावे. तळव्यांवर जखमांची सुरुवात असेल तर खास मऊ चपला बनवून घेतल्यास जखम बरी होते.
  • हातपाय शेकू नयेत. गरम, उष्ण वस्तूंपासून सावध राहावे,
  • दिवसातून दोन वेळा हातपाय स्वच्छ धुऊन तेल चोळावे.
  • खूप चाल पडल्यास विश्रांती घ्यावी.
  • काम करताना हत्यारे काळजीने वापरावीत.
  • जखमांची काळजी घेण्यासाठी रुग्णाला (किंवा नातेवाईकाला) मलमपट्टीबद्दल शिकवा.
  • हातातील किंवा पायातील विकृती वेळीच शोधून पुढील उपाय करा. यासाठी काही व्यायाम असतात. काही वेळा शस्त्रक्रियेने दुरुस्ती करावी लागते.
याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत
  • हा जिवाणूंचा आजार आहे. हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो; आनुवंशिक नाही हे समजावून सांगा. कुष्ठरोगाविषयी गैरसमज दूर करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
  • रुग्णाच्या नातेवाईकांची दर 6 महिन्यानंतर तपासणी आवश्यक आहे.
  • रोग उलटल्यावर पुन्हा ताबडतोब उपचार सुरू करायला पाहिजेत.
  • रुग्णाला आणि नातेवाईकाला संधी मिळेल त्याप्रमाणे आजाराबद्दल, उपचाराबद्दल, आवश्यक काळजीबद्दल कल्पना द्या.
  • सुमारे फक्त 15-20 टक्के रुग्ण सांसर्गिक असतात. सांसर्गिक रुग्ण असला तरी त्याला घरातून बाहेर काढणे चूक आहे. कारण एकतर रोग ओळखू यायच्या आधीच जवळच्या संबंधिताकडे जंतू गेलेले असतात. शिवाय औषधोपचार सुरू केल्यावर आठवडयातच रुग्ण असांसर्गिक बनतो. तसेच नवीन उपचार पध्दतीप्रमाणे (रिफॅपिसिन + डीडीएस) वर्ष-सहा महिन्यांत बरा होत असल्यामुळे त्याला पूर्ण उपचाराची व्यवस्था करा. मात्र औषधोपचार नियमित झाला पाहिजे. कुष्ठरोग झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा तो हक्क आहे. असांसर्गिक कुष्ठरोग वर्ष-सहा महिन्यांत पूर्ण बरा होतो. पण सांसर्गिक प्रकार पूर्ण बरा होण्यासाठी दोन-तीन वर्षेही जाऊ शकतात.
  • एकच चट्टा असलेल्या रुग्णास फक्त एक दिवसाचा उपचार करण्याची पध्दत आहे. या प्रकारात प्रतिकारशक्ती चांगली असल्याने एवढाही उपचार पुरतो.
  • काही व्यंग किंवा विकृती असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे उपाययोजना करावी.
  • जास्तीत जास्त रुग्ण शोधा, सर्वांना उपचारासाठी आणा. आपल्या भागात, खेडयात किती रुग्ण असावेत याच्या अंदाजासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचा सल्ला घ्या.
  • उपचार चालू करताना काही वेळा रिऍक्शन (प्रतिक्रिया) येते. गाठी येणे, ताप, नवे चट्टे येणे, इत्यादी त्रास दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञास दाखवणे आवश्यक आहे.
    • कुष्ठरोग बरा झाला आहे हे कसे ठरवतात ?

      आधुनिक बहुविध उपचाराने सर्वसाधारणपणे काही महिन्यांत शरीरातले जंतू मरतात. मात्र विकृती आली असेल तर ती मात्र हटणार नाही, ती फक्त वाढायची थांबेल. पूर्ण निरीक्षण करूनच उपचार थांबवण्याबद्दल ठरवता येईल. यासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

      • चट्टे आकाराने वाढत असल्यास,
      • चट्टयांची संख्या वाढत असल्यास,
      • चट्टयांचा जाडसरपणा, लाली कायम असल्यास,
      • सुजलेल्या नसा अजून दुखत असल्यास,
      • त्वचेच्या जंतुपरीक्षेत जंतू आढळल्यास

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.